अत्याधुनिक कत्‍तलखान्याच्या कंत्राटदाराला औरंगाबाद मनपाची नोटीस 

माधव इतबारे
Sunday, 15 November 2020

सहा महिन्यात उर्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश 
 

औरंगाबाद : पडेगाव येथील जुना कत्तलखाना बंद करून अत्याधुनिक कत्तलखाना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. कत्तलखान्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित दोन टप्प्याचे काम रखडल्यामुळे प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. सहा महिन्यात काम पूर्ण करण्याची तंबी या नोटीसीव्दारे देण्यात आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पडेगाव येथील १८ एकर जागेत महापालिकेने पीपीपी तत्त्वावर अत्याधुनिक कत्तलखाना उभा करण्याचा महापालिकेचा निर्णय वादात सापडला होता. मांस विक्रेत्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे २०१९ पर्यंत अत्याधुनिक कत्तलखान्याचे काम रखडलेले होते. दरम्यान प्रभारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कत्तलखान्यास अडथळा ठरणारे मांस विक्रेत्यांची गोदामे निष्कासित केली. त्यानंतर कंत्राटदार अल कुरेश एक्सपोर्टस् लिमिटेड कंपनीने कत्तलखान्याच्या उभारणीच्या कामाला गती दिली व मोठ्या जनावरांची कत्तल करणाऱ्या सेमी ऑटो प्लांटचे काम पूर्ण केले. मोठ्या १९६ जनावरांची कत्तल करण्याची क्षमता आहे. दुसऱ्या टप्प्यातील छोट्या जनावरांच्या कत्तलीसाठीच्या ऑटोमेटिक प्लांटचे काम लॉकडाऊनच्या काळात रखडले आहे. त्यामुळे प्रशासनाने कंत्राटदाराला नोटीस बजावत सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीनंतर काम सुरू करण्याची हमी कंत्राटदाराने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिकेला फटका 

कत्तलखान्यासाठी केंद्र शासन १४ कोटी ३४ लाख रुपयांची सबसिडी देणार होते मात्र कंत्राटदाराने ती नाकारली. कंत्राटदार जागेच्या बदल्यात महापालिकेला दरवर्षी एक कोटी रुपये रॉयल्टी देणार आहे. तसेच प्रकल्प सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडे दोन कोटी ६० लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. कंत्राटदाराने ४९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने महापालिकेला फटका बसला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Notice to the contractor of state-of-the-art abattoir