
प्रस्तावात फक्त अतिरिक्त बांधकामाचा उल्लेख
औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील राकाज् हेल्थ क्लब ॲन्ड ॲमिनिटी सेंटरच्या बीओटी प्रकल्पाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. याठिकाणी बेकायदा हुक्का पार्लर चालविणे, स्पा, मसाज सेंटर चालविल्याचे प्रकार तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत उघड झाले होते. त्याचा पंचनामा देखील करण्यात आला होता. मात्र कराराचे नूतनीकरण करताना प्रस्तावात फक्त अतिरिक्त बांधकाम केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे क्लबमधील बेकायदेशीर कामांच्या पुराव्यांना कोणाच्या आशीर्वादाने पाय फुटले? याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
ज्योतीनगरातील ८०४ चौरस मीटर जागा श्री. राका यांना महापालिकेने बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी दिली होती. त्यानुसार याठिकाणी जलतरण तलाव उभारण्यात आला. मात्र, हळूहळू राका यांनी हुक्का पार्लर, मसाज सेंटर व इतर व्यवसाय सुरू केले. पोलिसांना हुक्का पार्लरवर कारवाई केल्यानंतर राका यांचे बेकायदा व्यवसाय २०१५ मध्ये समोर आले. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे व पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, एका ठिकाणी स्वीमिंग करणाऱ्या महिलांना न्याहाळण्यासाठी खास खिडकी सोडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला. त्यामुळे संपूर्ण शहरात याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. सर्वसाधारण सभेत याविषयावर नगरसेवकांनी आक्रमक होत राका यांचा करारनामा रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यानंतर प्रकल्पाला कुलूप ठोकण्यात आले. या विरूद्ध विकासकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील बीओटी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नुसतीच बैठक घेतली व हा प्रकल्प पुन्हा राका यांनाच चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. हा क्लब हुक्का पार्लर, मसाज सेंटर, स्पासेंटरमुळे चर्चेत आला होता. नवा ठराव करताना हा प्रकल्प अतिरिक्त बांधकाम आणि वापर या कारणामुळे बंद करण्यात आला होता, असे नमूद केलेले आहे. दरम्यान या प्रकारांचे महापालिकेकडे पुरावेच नसल्याचे समोर आले. त्यामुळे हे पुरावे कोणामुळे नष्ट झाले याची चर्चा सुरू झाली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
डिव्हीआरही झाला होता गायब
पाहणीनंतर पदाधिकाऱ्यांनी क्लबमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सीसीटीव्हीचे फुटेज असलेला डीव्हीआर ताब्यात घेण्यात आला होता. मात्र नंतर तो महापालिकेतूनच गायब झाल्याचे समोर आले.
Edit-Pratap Awachar