आठवण दिली, अन् भडकले की पालकमंत्री ! 

माधव इतबारे
Wednesday, 16 September 2020

औरंगाबाद म्हटले की, कायमच राजकीय चर्चेला उधान असते. तसाच प्रकार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडला आहे. शहरातील रस्त्यांच्या बांधकामाबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक घेतली. त्यात महापालिकेच्या अधिकार्यांनी निधीबाबत पालकमंत्र्यांना आठवण करुन दिली. यावेळी अचानक पालकमंत्री अधिकार्यांवर भडकले..म्हणाले..! 
 

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र या निधीबाबत अद्याप शासनाकडून आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळांकडे असलेली कामे सुरू झालेली नाहीत. याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांना महापालिका अधिकाऱ्यांनी आठवण करून देताच ते भडकले. ‘महिन्यातून दोन वेळा मी औरंगाबादला येत असतो, आत्ता मला हा विषय सांगता का? ’ असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रस्त्यांसाठी जाहीर झालेल्या १५२ कोटीच्या निधीतून एमआयडीसीने आपल्या हिस्याची सात कामे सुरू केली आहेत. मात्र महापालिका व रस्ते विकास महामंडळ निधी संदर्भातील आदेशाची वाट पाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामेही सुरू होऊ शकली नाहीत. बुधवारी (ता. १६) महापालिकेच्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी रस्त्यांचा विषय निघाला. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने १५२ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिका, एमआयडीसी व रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या वाट्याला पन्नास कोटींची कामे आली आहेत, पण शासनाच्या नगर विकास खात्याने निधी बद्दलचा अध्यादेश अद्याप काढला नाही. त्यामुळे कामे सुरु करता येत नाहीत असे पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी देसाई यांना सांगितले. त्यावर सुभाष देसाई भडकले. निधी देण्याचा निर्णय दहा महिन्यापूर्वी झाला आणि निधी बद्दलचा अध्यादेश अद्याप निघाला नाही, हे तुम्ही आत्ता सांगत आहात? अशा शब्दात पालकमंत्र्यांनी जाब विचारल्यामुळे प्रशासक व अधिकारी मात्र निरुत्तर झाले. 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Road News