३६५ दिवस पुर्ण, तरीही पाणी योजना मार्गी लागेना; हे तर शहराचे दुदैवच!  

pani1.jpg
pani1.jpg

औरंगाबाद : शहरासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ५५ दिवसांमध्ये १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. मात्र, आघाडी सरकारला केवळ निविदा अंतिम करण्यासाठी ३६५ दिवस लागतात, हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. यासंदर्भात डीपीडीसीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.आठ) पालकमंत्री सुभाष देसाई यांना जाब विचारू, असा इशारा शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दिला. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आठवडाभरात ती पूर्ण होईल, असे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. 

समांतर पाणीपुरवठा योजनेचा प्रयोग फसल्यानंतर शहरासाठी १,६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली. अवघ्या ५५ दिवसांमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता; मात्र गेल्या वर्षभरापासून योजनेची निविदा प्रक्रियाच सुरू आहे. दुसरीकडे नाथसागर, हर्सूल तलाव काठोकाठ भरलेला असताना शहरवासीयांच्या घशाला मात्र तब्बल पाच दिवसांआड पाणी मिळत असल्याने कोरड पडली आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. योजनेला विलंब होत असल्याबद्दल शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली तर लवकरच योजनेचे काम सुरू होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. 

लोकप्रतिनिधी काय म्हणतात...!  

कालावधी निश्‍चित करून घेणार 
योजनलेा विलंब का होत आहे, यासंदर्भात शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे आम्ही विचारणा करू. योजनेसंबंधीचा निश्‍चित कालावधी ठरवून घेऊ. 
हरिभाऊ बागडे (माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार भाजप)

हे तर शहराचे दुर्दैव 
आघाडी सरकारला केवळ निविदा अंतिम करण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार विनंती केली; मात्र उपयोग झाला नाही.
अतुल सावे (आमदार भाजप)  

हे स्थगिती सरकार 
योजनेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्याचा निषेध करत मी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. प्रत्येक योजनेला स्थगिती देत आहे. भाजप जनतेसाठी बांधील असून, पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. 
विजय औताडे (जिल्हाध्यक्ष भाजप) 

आमदारांच्या बैठकीत पाणीपुरवठा योजनेचा विषय मांडला होता. कोरोनामुळे काही काळ विलंब झाला. मात्र, येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया अंतिम होऊन, प्रत्यक्ष कामाला सुरवात व काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल. - संजय शिरसाट (आमदार शिवसेना)

त्यांची फक्त घोषणाच 
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणाच केली होती. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून निविदा प्रक्रिया सुरू झाली. आता ती अंतिम टप्प्यात आहे. योजनेबद्दल सरकार पॉझिटिव्ह आहे. 
अंबादास दानवे (आमदार शिवसेना)
 
लवकरच काम सुरू 
योजनेची निविदा लवकरच अंतिम होऊन, कामाला सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच नेत्यांचे योजनेवर लक्ष आहे. वाढीव खर्चाच्या तरतुदीसंदर्भात अडचणी निर्माण झाल्याने काही काळ विलंब झाला. - नंदकुमार घोडेले (माजी महापौर) 

(Edited By Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com