औरंगाबादकरांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताय, सावधान!

योगेश पायघन
शनिवार, 4 जानेवारी 2020

देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षातील अधिकारी, आणि सातारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. तीन) सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणारे विक्रेते आणि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर 11 जणांवर कारवाई केली. यात 3600 रु. रुपये दंड वसूल केला.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शाह यांनी दिलेल्या माहीतीनुसार, देवळाई चौक व बीड बायपास परीसरात मोहीम राबवली गेली. यात एकूण 11 जणांवर कारवाई करून तीन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे व कर्मचारी टी. जे. पवार, डी. एच पेअर, व्ही.एच.भावे यांचा या पथकात समावेश होता.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (विक्री, विपणन,आवेष्टन जाहिरात) नियंत्रण कायदा 2003 चे कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे. तंबाखूयूक्त पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे. तसेच प्रत्येक तंबाखू, सिगारेट विक्रेत्याने आपल्या दुकानात 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू पदार्थ विक्री केले जाणार नाही असा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक हॉटेल उपहारगृहात धुम्रपान मनाई बाबत फलक लावणे आवश्यक आहे. यानियमाचे उल्लंघन करणारास  200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकातर्फे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात नियमीत कारवाई केली. या पथकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍या व्यक्तिंवर आणि पानटपरी चालकांवर कारवाई केली. तसेच उपस्थित लोकांना तंबाखू, सिगारेट सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहीती दिली.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

काय आहेत नियम

  • कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यासाठी मनाई आहे. 
  • कलम 5 नुसार तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाची जाहीरात करण्यास मनाई आहे
  • कलम 6 अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नये. विक्रेत्याने तसा फलक आपल्या दुकानात लावणे बंधनकारक 
  • कलम 6 ब नुसार शाळा, महाविद्यालय परिसरात 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई आहे. 
  • कलम 7 नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे लेबलवर 85% भागात चित्रमय इशारा आणि वैधानिक इशारा छापणे बंधनकारक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News About Tobaco Ban