CoronaVirus : औरंगाबादकरांनो सावधान, चक्रीवादळाचा जाणवेल परिणाम 

अनिलकुमार जमधडे
Tuesday, 2 June 2020

पावसाला सुरवात, मुसळधार पावसाची शक्यता 

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या परिणामाला सुरवात झाली आहे. यामुळे मंगळवारी (ता. दोन) दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. बुधवारी (ता. तीन) चक्रीवादळामुळे औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

‘निसर्ग’ वादळ अरबी समुद्रापासून मुंबईच्या दिशेने निघाले असून साधारण मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबईच्या दक्षिणेकडील हरिहरेश्वर गणपतीपुळे, पाटण, चिपळून या भागात धडकणार असल्याची माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मध्यप्रदेशच्या दिशेने वादळ सरकणार

तब्बल १५० किलोमीटर प्रतितास या वेगाने चक्रीवादळ वाहणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या जवळून मालेगाव, धुळे आणि पुढे मध्यप्रदेशच्या दिशेने वादळ सरकणार आहे. असे असले तरीही या वादळामुळे औरंगाबाद जिल्ह्यातही मोठा परिणाम दिसण्याची शक्याता आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुसळधार पावसाची शक्यता

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. वादळी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किलोमीटर दरम्यान राहील असा अंदाज वैज्ञानिक स्वानंद सोळुंके यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हा प्रशासन गाफील 

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम औरंगाबाद व जालना जिल्ह्यावर होऊ शकतो. त्यामुळेच शहरातील रहिवाशी आणि बेंगलुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक स्वानंद सोळुंके यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच पालकमंत्र्यांना ट्वीट करुन माहीती दिली. मात्र जिल्हाप्रशासन गंभीर नसल्याचे लक्षात आले. चक्रीवादळाच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाला अद्याप मंत्रालयातून सुचना आल्या नाही असे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगीतले. वास्तविक पहाता हवामान विभागाच्या वेबसाईटवर सर्व लाईव्ह माहिती असताना सतर्क राहण्यासाठी जिल्हाप्रशासनाला मंत्रालयाच्या आदेशाची गरज काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Residents Be Alert, Cyclone May Affect