esakal | आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, नव्या वर्षासाठी नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Right To Education News

शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, नव्या वर्षासाठी नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.


आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अर्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

...तर संस्थावर कारवाई
आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक संस्था, एनजीओ खोटी माहिती भरून पालकांची दिशाभूल करतात. या संस्था, एनजीओ मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी खोटा पत्ता, शाळेजवळ घर असल्याचे भासवतात. अशा तक्रारी आल्यास संबंधित संस्था, एनजीओविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

संभाव्य वेळापत्रक
- ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
- ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
- ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
- ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चिती
- २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
- १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
- २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
- १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा
 

Edited - Ganesh Pitekar