
प्रशासकांचे आदेश - सौरऊर्जेचा होणार वापर
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील लहान मुलांचे आकर्षण असलेली मिनी ट्रेन दोन वर्षांपूर्वी प्रदूषणाच्या कारणावरून बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. दहा) उद्यानाची पाहणी केली. इलेक्ट्रिक किंवा सौरऊर्जेवर चालणारी मिनी ट्रेन सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय शहरातील एकमेव मनोरंजनाचे ठिकाण आहे. शहरासह मराठवाडा, विदर्भातील लाखो पर्यटक येथे दरवर्षी भेटी देतात. विविध शाळांच्या सहलींनी उद्यान व प्राणिसंग्रहालय फुलून जाते. शहरातील नागरिक दिवसभराचे नियोजन करून डबे घेऊन उद्यानात येतात. या ठिकाणी असलेली लहान मुलांची झुकझुक गाडी आकर्षणाचा विषय होती. डिझेल इंजिनवर चालणारी मिनी रेल्वे अनेक वर्षांपासून उद्यानात धावत होती.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र उद्यानाशेजारी असलेल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना प्रदूषण व आवाजाचा त्रास होत असल्याचा आक्षेप केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतला होता. प्राधिकरणाच्या आदेशानुसार २०१८ मध्ये ही मिनी ट्रेन बंद करण्यात आली. त्यानंतर इलेक्ट्रिक ट्रेन सुरू करण्याचे वारंवार आदेश झाले मात्र मिनी ट्रेन काही सुरू झाली नाही. दरम्यान, गुरुवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी उद्यानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंद पडलेली मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. इलेक्ट्रिक इंजिन, शक्यतो सोलर एनर्जी पॅनेल लावून सौरऊर्जेवर ट्रेन चालवावी, असे प्रशासकांनी सांगितले. प्रशासकांनी मत्स्यालयाची पाहणी व माशांच्या दुर्मिळ प्रजाती ठेवण्यास सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेताना प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मजनू हिलचा प्रस्ताव पडून
हडकोतील मजनू हिल येथील स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी ट्रेन सुरू करण्याच्या ३६ लाखांच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी ट्रेन सुरू झालेली नाही. दिवाळीपर्यंत उद्यानात मिनी ट्रेन धावेल, अशी आशा तेव्हा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दुसरी दिवाळी आली तरी मिनी ट्रेन सुरू झालेली नाही.
(संपादन-प्रताप अवचार)