स्मार्ट सिटीच्या नव्या सीईओंच्या नियुक्तीवर आक्षेप, आस्तिककुमार पांडेय यांचे वरिष्ठांना पत्र

माधव इतबारे
Thursday, 4 February 2021

शहरातील स्मार्ट सिटी योजनेत निवड झाल्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली.

औरंगाबाद : महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे काम पाहत असताना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओपदावर (मुख्य कार्यकारी अधिकारी) मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतून सुरू असलेल्या महापालिकेच्या कामावर परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात आता महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मनोहरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी नियुक्ती रद्द करण्याची मागणी त्यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे.

शहरातील स्मार्ट सिटी योजनेत निवड झाल्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. कार्पोरेशनचे चेअरमन म्हणून शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिका आयुक्तांकडे सोपविण्यात आला. त्यानुसार आत्तापर्यंत काम सुरू होते. प्रत्येक आयुक्तांनी स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेच्या कामांना झुकते माप दिले. महापालिकेच्या आर्थिक अडचणीमुळे जी कामे होऊ शकत नाहीत, ती स्मार्ट सिटीत घेण्यात आली.

यातील अनेक कामे सध्या सुरू आहेत. असे असतानाच नगरविकास खात्याने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महापालिका व स्मार्ट सिटीचे कामकाज वेगवेगळे होणार आहे. यासंदर्भात श्री. पांडेय यांनी आक्षेप नोंदविला असून ही नियुक्ती रद्द करण्याची लेखी मागणी त्यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे याबाबतचे पत्र पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

पद रिक्त नसताना नियुक्ती कशी?
याविषयी पाठविलेल्या पत्रात पांडेय यांनी १८ जून २०१६ च्या शासनाच्या पत्राचा हवाला दिला आहे. स्मार्ट सिटीचे सीईओ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतील व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असे या पत्रात नमूद आहे. पण मनोहरे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नाहीत. तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने सीईओ म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्या हे पद रिक्त नाही, असेही पांडेय यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे करणार मागणी
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओपदी महापालिकेचे आयुक्त कार्यरत असल्याने शहरातील विकास कामांना गती मिळाली आहे. श्री. पांडेय यांनी शहरात विकास कामांचा धडका सुरू केला आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट सिटीतील त्यांची कामे उल्लेखनीय आहेत. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओपद पांडेय यांच्याकडेच ठेवण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली जाणार असल्याचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Smart City Udpates Astik Kumar Pandey Registered Objection