प्रतिस्पर्धी उमेदवारांनीही केले बलांडे, गलांडेंना मतदान 

मधुकर कांबळे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या चार सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी (ता.14) निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या अनुभवावरून प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या चार समित्यांच्या सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेनेच्या मोनाली राठोड यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. 

अनुराधा चव्हाण महिला व बालकल्याण तर मोनाली राठोड समाजकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या. उर्वरित दोन विषय समितीसाठीच्या सभापतिपदावर शिवसेनेचे अविनाश गलांडे आणि किशोर बलांडे बहुमताने विजयी झाले. 

जिल्हा परिषदेच्या चार सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी (ता.14) निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीच्यावेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या अनुभवावरून प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. ओळखपत्र पाहूनच प्रत्येकाला परिसरात सोडण्यात आले. 

वाचून तर बघा : वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 

मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 पासून निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली. सकाळी 11 ते एक ही वेळ उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी होती. समाजकल्याण सभापतिपदासाठी शिवसेनेच्या मोनाली राठोड, रमेश पवार व कॉंग्रेसच्या पाठिंब्याने विजय चव्हाण यांनी तर महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी मोनाली राठोड आणि भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 
वित्त व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण या दोन समित्यांसाठी शिवसेनेचे अविनाश गलांडे, रमेश पवार, सत्तार समर्थक व कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले; पण नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलेले किशोर बलांडे, कॉंग्रेसचे श्रीराम महाजन, पंकज ठोंबरे यांनी अर्ज दाखल केले होते.

  क्‍लिक करा : म्हणुन विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनीक 

बलांडे, गलांडे बहुमताने विजयी 

समाजकल्याण समितीसाठीचे उमेदवार रमेश पवार व विजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मोनाली राठोड यांची बिनविरोध निवड झाली. तसेच श्रीमती राठोड या समाजकल्याण सभापती झाल्याने त्यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेतल्याने अनुराधा चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. 
वित्त व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी मतदान झाले. पंकज ठोंबरे यांनी माघार घेतल्याने चौघेच मैदानात राहिले होते. यामध्ये किशोर बलांडे आणि अविनाश गलांडे यांना प्रत्येकी 60 मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नीता राजपूत या तटस्थ राहिल्या. श्रीराम महाजन आणि रमेश पवार यांना एकही मत मिळाले नाही. त्यांनीही श्री. बलांडे आणि श्री. गलांडे यांना मतदान केले. 
शिवसेना, सत्तार समर्थक व भाजपच्या समर्थकांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करत जिल्हा परिषदेत जल्लोष केला. किशोर बलांडे यांना उचलून खांद्यावर घेतले. 

हे वाचा : जयभगवान गोयल यांना अटक करावी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad z.p. speaker election