औरंगाबादच्या नवीन पाणी योजनेला मुहूर्त, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी होणार सुरुवात

मधुकर कांबळे
Wednesday, 9 December 2020

औरंगाबाद शहराच्या पाणी योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या योजनेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणी योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या योजनेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या शनिवारी (ता.१२) गरवारे स्टेडियमवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात होईल. शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून जलवाहिनी टाकण्यात येईल. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता. नऊ) ऑनलाईन पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना सांगितले की, या योजनेसाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोरोनामुळे कामांचे भूमिपूजन रखडले होते. आता त्याला गती मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनेबरोबरच शहरातील विविध विकास कामांचीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरूवात होणार आहे. जीवन प्राधिकरण व महापालिकेच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे.

या योजनेमुळे शहरातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसरालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख होणार असून त्यावेळच्या लोकसंख्येला पाणी पुरविण्याचे याव्दारे उद्दिष्ट ठेवले आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. शहरातील कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही. तसेच या योजनेचे खासगीकरण देखील होणार नाही. वाजवी दरात नागरिकांना पाणी मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

सफारी पार्कसह विविध कामांचीही सुरूवात
पाणीपुरवठा योजनेबरोबरच या दौऱ्यांत मुख्यमंत्री ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, जंगल सफारी पार्क व रस्त्याच्या कामांचेही भूमिपूजन करतील. विविध विकासकामांच्या अनुषंगाने या शहराचे सुपर औरंगाबाद व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार कामांची सुरूवात होत आहे. विकासाच्या घोडदौडीतील हे पहिले पाऊल असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी नमूद केले.

या योजनेतून होतील ही कामे
योजनेत प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उदभव विहीर व पंपगृह, ३९२ एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र, शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ४९ उंच तर ४ जमिनीलगत अशा पाण्याच्या ५३ टाक्या, जवळपास ४० किलोमीटर लांबीची अशुध्द पाण्याची जलवाहिनी, ८४ किलोमीटर पाणी वाहून नेणारी जलवाहिनी व १,९११ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, सुमारे ९० हजार घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे, स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी, एक्सप्रेस फिडर या कामांचा समावेश आहे. नक्षत्रवाडी येथे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

खासगीकरण नाही,पाणीपट्टीही वाजवी
नवीन पाणी योजना संपूर्णपणे शासन निधीतून केली जात आहे. त्यामुळे या योजनेचे खासगीकरण होणार नाही. तसेच ही योजना पूर्ण झाल्यानंतर ती चालविण्यासाठी जो खर्च अपेक्षित आहे, त्यानुसार पाणीपट्टी आकारली जाईल. ही पाणीपट्टी वाजवी असेल, असा दावा पालकमंत्र्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad's New Water Scheme Inauguration On Saturday