
भाजप हा हिंदू धर्माचा पक्ष आहे, ते ख्रिश्चन व इतर धर्मांच्या लोकांना मारतात,अशी खोटी माहिती काँग्रेसने सर्वत्र पसरवली होती. याच आफवेमुळे आमच्याकडे कोणीच येत नव्हेत.
औरंगाबाद : भाजप हा हिंदू धर्माचा पक्ष आहे, ते ख्रिश्चन व इतर धर्मांच्या लोकांना मारतात,अशी खोटी माहिती काँग्रेसने सर्वत्र पसरवली होती. याच अफवेमुळे आमच्याकडे कोणीच येत नव्हेत. मात्र आज चित्र बदलले आहे. केवळ भाजपच देशाला सुरक्षित ठेवू शकतो, असा विश्वास सर्वांमध्ये आला आहे. केंद्रात सत्ता आल्यापासून जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशाचा विकास झाला आहे, असा दावा केंद्रीय क्रीडा व युवकमंत्री किरेन रिजीजू यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलताना केला.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड
औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मध्ये स्टेनलेस स्टील जलतरण तलाव आणि हॉकी टर्फच्या उद्घाटन गुरुवारी (ता.२४) मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झाले. त्त्यावेळी ते बोलत होते. नंतर त्यांनी उस्मानपुरा येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयास भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप शहर कार्यकारिणीतर्फे झाल्टा फाटा ते शरणापूर फाटा असा १५ किलो मीटरचा सायकलिंग ट्रक आणि सिडको येथे मल्टी टास्टिकंग जिम्नॅशियम हॉल खेळाडूसाठी बांधण्यात यावेत. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री रिजीजू यांना देण्यात आले. केंद्रीय मंत्री रिजीजू म्हणाले, काँग्रेसने हिमाचल अरुणाचल प्रदेशात भाजप विषयी अफवा पसरवली होती. या अफवेमुळे भाजपच्या कार्यालयाकडेही कोणीच फिरकत नव्हते. आम्ही मेहनत घेऊन ही अफवा खोडून काढली. त्यानंतर आता प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचे डिपोझिट आम्ही जप्त केले होते. विरोधकांची म्हण आम्ही खोटी करून दाखवली.
केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर पूर्व-उत्तर भारत, पश्चिम भारत, लडाखपासून ते कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विकास झाला आहे. याच विकासातून देश मजबूत बनला आहे. मात्र काही विदेश ताकद आणि देशातील नुकसान होईल असा विचार करणारे लोक देशाला दुबळे बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही रिजीजू यांनी केला. याच विचारातून नरेंद्र मोदीना विरोध होत असल्याचेही रिजीजू म्हणाले.
औरंगाबादेत आल्यावर मला ऊर्जा मिळते. यासह महाराष्ट्रातील भाजपमुळे राष्ट्रवादीची प्रेरणा मिळते असेही रिजीजू म्हणाले. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,खासदार डॉ.भागवत कराड,आमदार अतुल सावे, भाजप शहाराध्यक्ष संजय केणेकर,माजी महापौर भगवान घडामोडे, प्रविण घुगे, विजय औताडे, एजाज देशमुख, शिवाजी दांडगे,समीर राजूरकर महिला मोर्चाच्या अमृता पादोलकर, सविता कुलकर्णी व मान्यवर उपस्थित होते.
भाजप शहराध्यक्षातर्फे चुकीची माहितीचा प्रसार
प्रस्तावनेत भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी वेरुळ येथे छत्रपती संभाजी महाराजाची समाधी आहे, असा उल्लेख केला. उपस्थित महिला मोर्चाच्या सदस्यांनी केणेकरांनी त्यांची चुक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी वेरूळ येथे शहाजी भोसलेंचा उल्लेख केला. बोलण्याच्या ओघात केणेकर केंद्रीय मंत्र्यांसमोर चुकीचा इतिहास सांगत होते. सावधगिरीमुळे हा प्रकार टळला.
संपादन - गणेश पिटेकर