भाजपला सुरूंग लावण्याचे अब्दुल सत्तारांचे मनसुबे यशस्वी; पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

सचिन चोबे
Tuesday, 12 January 2021

ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कुडके यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतांना तालुक्यात पक्षांतराचे वारेदेखील वाहू लागले आहेत. याचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील भाजपला बसला आहे. तालुक्यात वर्षभरापासून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पक्षांतराची वाट धरली. विधानसभेची रणधुमाळी सुरू असतांना भाजपचे निष्ठावान असलेले राजेंद्र ठोंबरे, डॉ.मच्छिंद्र पाखरे यांनी विधानसभेत युतीचा प्रचार करीत शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत शिवसेनेशी जवळीक साधली.

अद्यापही ते शिवसेनेसोबतच जोडल्या गेले आहेत. भाजपच्या पंचायत समिती सदस्या डॉ. कल्पना जामकर, काकासाहेब राकडे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापतीची माळ गळ्यात पाडून घेतली. बाजार समितीचे माजी उपसभापती ठगणराव भागवत यांनी देखिल मुंबईत गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कुडके यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. तालूक्यात तळागाळातील भाजपचा कार्यकर्ता या वातावरणामुळे सैरभैर झाला असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांना उभारी देणे गरजेचे असताना भाजपचे नेते त्यांच्या गावच्या निवडणूकीत गुंतले आहेत.

राज्य पातळीवरील भाजपचे नेतृत्व गप्प का?
तालुक्यात भाजपचे डझनभर नेते असतांना कार्यकर्ता मात्र पोरका झाल्याची परिस्थिती आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्याकडे प्रदेश चिटणीसची जबाबदारी आहे. भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी गेल्या दहा वर्षांपासून मकरंद कोर्डे जबाबदारी सांभाळत आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

त्याखालोखाल माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्यपद आहे. या सर्वांनी मिळून तालूक्यात भाजपचा पाया भक्कमपणे उभा ठेवणे गरजेचे आहे. यातील काही नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय तर काही नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. या सर्व बाबींचा विचार करता प्रदेश कार्यकारिणीत काम करतांना तालूक्यातील नेत्यांच्या सुचनांकडे वरिष्ठ नेते दुर्लक्ष तर करित नाही ना याची चर्चा तालूक्यात जोरदारपणे सुरू आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Office Bearers Joined Shiv Sena, Abdul Sattar Plan Successful Aurangabad News