औरंगाबादेतील व्यावसायीकांची ई-कॉमर्सच्या धर्तीवर वाटचाल !   

प्रकाश बनकर
Sunday, 18 October 2020

वेगवेगळ्या ऑफर्स देत ऑनलाइनचा वापर करीत ग्राहकांना करताहेत आकर्षित 

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे अतोनात नुकसान झालेला व्यापार-व्यवसाय आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउन काळात ई-कॉमर्स कंपन्‍यांनी बक्कळ कमाई करीत प्रत्येकाच्या मनात विश्‍वास निर्माण केला. याच माध्यमातून या कंपन्यांची या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. या कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु वेगवेगळ्या ऑफर्स देत ऑनलाइनचा वापर करीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनीही कंबर कसली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड्स कॉमर्ससह व्यापारी संघटना आता ई-कॉमर्स कंपन्यांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. स्थानिक व्यापारी आता ऑनलाइनचा वापर करू लागले आहेत. जिल्ह्यातील जवळपास २० टक्केहून अधिक व्यापारी स्वतः ई-कॉमर्समध्ये उतरत ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लॉकडाउन काळात व्यापाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत ई-कॉमर्सकडे वळले. यात काही व्यापाऱ्यांनी स्वतःचे अॅप डेव्हलप करत स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात त्यांच्या ग्राहकापर्यंत पोहोचवली. यात वेगवेगळे डिस्काउंट देत हा ग्राहक दुसऱ्या ई-कॉमर्स कंपनीकडे जाऊ दिला जात नाही. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या व दसरा आणि दिवाळीसाठी वेगवेगळे प्लॅन आखत असल्याचे मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड्स कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले. ज्या व्यापाऱ्यास अॅप बनविणे शक्य नाही, अशा छोट्या व्यापाऱ्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाइन सेवा देत आहेत. फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देत आहेत. यासाठी प्रत्येक व्यावसायिकांनी ऑनलाइनचे सेक्शन तयार केले आहे, असे श्री. मालानी यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

बँकांचीही साथ 
नोटबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्राधान्य दिले जात होते. यासाठी बँकातर्फे व्यापारी आस्थापना याठिकाणी स्वाइप मशीनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते; मात्र त्याचे प्रमाण १० ते २० टक्के होते. मात्र लॉकडाउननंतर छोट्यातील छोट्या व्यावसायिकांनीही ‘गुगल पे’, ‘फोन पे’, ‘पेटीएम'चा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. यामुळे कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य मिळत आहे. यासाठी बँकांतर्फेही ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी व्यापाऱ्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. यात नेट बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटीवरील चार्जही कमी केले आहे. ई-कॉर्मसप्रमाणेच व्यापारी सावध होत त्यांनी बदलाची कास धरली आहे. त्याच कंपन्यांच्या धर्तीवर व्यापारी सेवा देत आहेत. अडचणीच्या काळात स्थानिक व्यापारीच कामाला येतो. याविषयी सर्वसामान्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. लोकही व्यापाऱ्यांना साथ देत आहेत. ई-कॉमर्ससारख्याच प्रभावी ऑफर्स स्थानिक व्यापारी देत आहेत. यामुळे दिवाळी व्यापाऱ्यांसाठी चांगली राहणार आहे. 
-प्रफुल्ल मालानी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड्स अँड कॉमर्स 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessmen follow e-commerce method Aurangabad news