शिर्डी संस्थानच्या सीईओंना व्यक्तिशः उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश समितीच्या बैठकीत आडकाठी आणणे भोवले 

सुषेन जाधव
Tuesday, 15 September 2020

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे असून, ते समितीच्या बैठकीत आडकाठी आणत असल्याने समितीचे कामकाज सुरळीत होत नसल्याचा अहवाल समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केला. याप्रकरणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी कुलकर्णी यांनी सीईओ बगाटे यांना २३ सप्टेंबरला व्यक्तिशः खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या परवानगीने नगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असलेली तदर्थ समिती सध्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे.

हेही वाचा- एमआयएमच्या माजी नगरसेवकाने साथीदारांच्या मदतीने केला चाकूहल्ला: गुन्हा दाखल 

समितीचे सचिव हे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे असून, ते समितीच्या बैठकीत आडकाठी आणत असल्याने समितीचे कामकाज सुरळीत होत नसल्याचा अहवाल समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केला. याप्रकरणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी कुलकर्णी यांनी सीईओ बगाटे यांना २३ सप्टेंबरला व्यक्तिशः खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान खंडपीठाने शासनाकडून नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करेपर्यंत नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, संस्थानचे सीईओ, अतिरिक्त विभागीय आयुक्त (नाशिक), सहधर्मादाय आयुक्त (नगर) यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे आदेश ऑक्टोबर २०१९ मध्ये दिले होते.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

संस्थानचे तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना विचारात न घेता, खंडपीठाची पूर्वपरवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दल अहवाल खंडपीठात सादर करण्यात आला होता. त्यानंतर संस्थानच्या सीईओपदी के. एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सीईओ बगाटे हे तदर्थ समितीच्या बैठकीत आडकाठी निर्माण करत असून, तदर्थ समितीचे कामकाज सुरळीत होऊ देत नसल्याचा अहवाल समितीचे खंडपीठ नियुक्त अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर यांनी खंडपीठात सादर केला.

त्याची खंडपीठाने गंभीर दखल घेत तदर्थ समिती स्थापन करण्यात आल्यापासून सीईओ सहकार्य करत नसल्याचे निरीक्षण नोंदवत सीईओ बगाटे यांना खंडपीठाने व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी २३ सप्टेंबरला होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सतीश तळेकर, ॲड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. संस्थानतर्फे ॲड. संजय चौकीदार, तर शासनातर्फे ॲड. काळे काम पाहत आहेत. 
हेही वाचा- औरंगाबादेत रेल्वे स्टेशन परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, ११ जणांना घेतले ताब्यात, २ लाखांचा ऐवज जप्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CEO of Shirdi Sansthan Physically Present In HighCourt of Bombay Bench