esakal | बोगस बंगाली डॉक्टरवर गुन्हा, चिकलठाणा भागात करत होता मुळव्याधवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

0Crimenews_13

शैक्षणिक पात्रता नसतानाही मूळव्याध, भगंदर यासह इतर विविध आजारांवर उपचार करणाऱ्या एका बोगस बंगाली डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी (ता. २३) कारवाई केली.

बोगस बंगाली डॉक्टरवर गुन्हा, चिकलठाणा भागात करत होता मुळव्याधवर उपचार

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शैक्षणिक पात्रता नसतानाही मूळव्याध, भगंदर यासह इतर विविध आजारांवर उपचार करणाऱ्या एका बोगस बंगाली डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी (ता. २३) कारवाई केली. बोगस डॉक्टर व्यावसायिक शोध समितीने चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आले. डॉ. नयन ढाली असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तो चिकलठाणा भागात रुग्णांवर उपचार करत होता.


महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार चिकलठाणा परिसरात सावित्रीनगरात दुर्गामाता नावाचा दवाखाना आहे. याठिकणी बंगाली डॉक्टर नयन ढाली हा रुग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार काही नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. याठिकणी मूळव्याध, भगंदर यासह विविध आजारांवर उपचार केले जात होते. या तक्रारीची दखल घेत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले.

त्यानुसार चिकलठाणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी स्थळ पाहणी करून डॉ. नयन ढाली यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी केली व अहवाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर शासनाने नियुक्‍त केलेल्या बोगस डॉक्टर व्यावसायिक शोध समितीची बैठक श्री. पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबरला घेण्यात आली. त्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

अनेक वर्षांपासून केले जात होते उपचार
चिकलठाणा येथे या बोगस डॉक्टराचा व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अर्चना राणे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय दंडसंहिता १८६० कलम ४१९ व ४२० व महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम १९६१ कलम-३३, ३३ अ, ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited - Ganesh Pitekar

go to top