कोचिंग क्लासेस एक नोव्हेंबरलाच सुरु करु, कारवाई केली तर संघटनेनेचा आत्मदहनाचा इशारा

coaching.jpg
coaching.jpg

औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर खासगी क्लासेसला एक नोव्हेंबरपूर्वी सुरु करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व क्लासेस केंद्र सरकारच्या नियमावलीच्या अधीन राहून, पालकांचे हमीपत्र घेऊन एकाच दिवशी सुरू करण्यात येतील. त्यानंतर एकाही संचालकावर कार्यवाही केल्यास आत्मदहन करु, अशा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशन राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी शनिवारी (ता.२४) पत्रकार परिषदेत दिला.

राज्यात सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांचा उदरनिर्वाह कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चालतो. मागील सात महिन्यांपासून क्लासेस कुलूपबंद असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी हजारो मुले स्पर्धा परीक्षेची तयारी क्लासेच्या माध्यमातून करतात. परंतु कोचिंग क्लासेस बंद असल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी. कोचिंग क्लासेस जागा मालकांनी भाडेमाफ करण्यासंबंधी शासनाने अध्यादेश काढावा, एक वर्षाचे जीएसटी, व्यवसाय कर, आयकर, लाईटबील, स्थानिक कर माफ करावा, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एक एप्रिलपासून कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना वीस हजार तर संचालकांना ४० हजार रुपये प्रतिमाह मानधन द्यावे, क्लासेस क्षेत्राचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, या व्यावसायिकांना मुद्रा लोन देण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रा. पंढरीनाथ वाघ, प्रा. ज्ञानेश्‍वर ढाकणे, आप्पासाहेब म्हस्के पाटील, प्रा. प्रशांत बनसोड पाटील, प्रा.अजबराव मनवर, प्रा. वैशाली डक पाटील यांची उपस्थिती होती. 

राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 
खासगी कोचिंग क्लासेच्या प्रश्‍नावर लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.२६) कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सीसीएचे मार्गदर्शक प्रा. प्रशांत बनसोडे यांनी सांगीतले. 

कोचिंग क्लासेसची व्यथा 
मराठवाड्यात दहा हजार कोचिंग क्लासेसमध्ये ५० हजार खासगी शिक्षक शिकवतात, तर औरंगाबादमध्ये तीन हजार क्लासेसच्या माध्यमातून २५ हजार शिक्षकांचा उदरनिर्वाह चालतो. कोचिंग क्लासेस हे क्षेत्र असंघटित असल्यामुळे शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. खासगी क्लासेस कोणत्या विभागाअंतर्गत येतात याची कुठलीही नोंद शासनाकडे नाही. केवळ शॉपॲक्ट लायसनवर हे क्लासेस चालतात. क्लासेसवर कोणाचे नियंत्रण असावे हे शासनाकडून स्पष्ट करावे, अशी मागणी खासगी क्लासेस संचालकांनी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com