esakal | औरंगाबाद महापालिकेची काँग्रेसकडून तयारी, अमित देशमुख यांनी मुंबईत बोलवली बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

3amit_20deshmukh_0

काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून पुढील रणनिती ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

औरंगाबाद महापालिकेची काँग्रेसकडून तयारी, अमित देशमुख यांनी मुंबईत बोलवली बैठक

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून पुढील रणनिती ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबादचे संपर्कप्रमुख तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१७) मुंबईत शहरातील मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी महापालिका निडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे आदेश अमित देशमुख यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते.

प्रामुख्याने शिवसेना आणि काँग्रेसकडून त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा अमित देशमुख यांनी औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गेल्या बैठकीत त्यांनी गांधी भवनातील पक्ष कार्यालयात महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा, असे आदेश दिले होते.


आता याच अनुषंगाने आणि शिवसेनेकडून विकासकामांचे भूमीपुजन करत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाल्यानंतर अमित देशमुख यांनी देखील गरुवारी (ता.१७) शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार एम.एम शेख, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे यांच्यासह मोजक्या तीस पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार अशी चर्चा आहे. असे असले तरी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतली असे या पक्षांकडून सांगितले जाते.

Edited - Ganesh Pitekar