कोरोनामुक्तीसाठी नागरिकांना देणार ही शपथ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

सोमवारपासून शहरात कोरोनामुक्तीसाठी अभियान राबविले जाणार आहे ते २४ मेपर्यंत चालणार असून, पहिल्या दिवशी शहर रेड झोनमधून ग्रीनमध्ये आणण्यसाठी नागरिकांना शपथ दिली जाणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहर मेअखेर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता.११) अभियान राबविले जाणार आहे ते २४ मेपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी शहर रेड झोनमधून ग्रीनमध्ये आणण्यसाठी नागरिकांना शपथ दिली जाणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. 

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांनी ३० मेपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार माझा वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ११ ते २४ मे दरम्यान प्रत्येक वॉर्डात कोरोनामुक्तीची मोहीम त्या-त्या वॉर्डच्या नगरसेवकांच्या मदतीने राबवली जाणार आहे. ११ ला सकाळी ११ वाजता कोरोनामुक्त वॉर्ड करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहर रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये परावर्तीत झाल्याशिवाय मी घराबाहेर पडणार नाही, अशी शपथ दिली जाणार आहे. 

असे आहेत कार्यक्रम 
१२ ला घरात जनजागृती गीतगायन दिवस साजरा करावा. त्यात कोरोनामुक्तीचे किमान पाच गाणे, कविता म्हणाव्यात. १३ ला दीप महोत्सव साजरा करावा. रात्री आठ वाजता घरासमोर, गच्चीवर, गॅलरी, व्हरांड्यात, दारासमोर दिवा लावावा. १४ ला कोविड योद्ध्यांचे अभिनंदन करावे. डॉक्टर, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, टास्क फोर्ससाठी २०० शब्द लिहून फेसबुकवर शेअर करावेत. १५ ला अ‍ॅन्टी कोरोना पोलिस स्थापना दिवस पाळावा.

या दिवशी कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करावा. कोरोनाशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करावी. १६ ला स्वत:चा सन्मान दिवस व १७ ला माझे गुरू-माझे आदर्श दिवस, १८ ला समूह गायन, १९ ला निबंधलेखन व चित्र काढणे दिवस, २० ला रंगोत्सव, २१ ला माझे आरोग्य माझ्या हाती, २२ ला मीच माझा रक्षक, २३ ला दो गज दुरी व २४ रोजी आनंदोत्सव दिवस साजरा करावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad