दिल्लीला टाकले औरंगाबादने मागे पण कशात...

माधव इतबारे
Wednesday, 22 July 2020

कोरोनाा संशयितांच्या महापालिकेने आतापर्यंत ८० हजार चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष (परमिलियन टेस्ट) ६७,६८९.३ एवढे आहे. औरंगाबादपेक्षा गोवा शहराचे प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

औरंगाबाद ः शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी जास्तीत जास्त रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेतर्फे ट्रेस-टेस्ट-आयसोलेट प्रक्रियेचा वापर केला जात आहे. हीच पद्धत देशभर राबविली जात आहे. त्यात औरंगाबाद महापापालिकेने दिल्लीला मागे टाकले आहे. देशात औरंगाबाद शहर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ हजारांच्या घरात गेली आहे. एकीकडे आकडे वाढत असले तरी दुसरीकडे महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण अनेकपटींनी वाढविले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे, त्या सर्वांचे स्वॅब घेऊन चाचणी करणे. पॉझिटिव्ह अहवाल येताच त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, ही पद्धत अवलंबली जात आहे. ही पद्धत ट्रेस-टेस्ट आणि आयसोलेट नाावाने ओळखली जाते. सध्या रूग्णांच्या संपर्कातील सरासरी १५ व्यक्तींना शोध घेतला जात आहे. त्यात अ‍ॅन्टिजेन टेस्टचा कमी वेळात अहवाल येत असल्याने महापालिकेने ट्रेस-टेस्ट-आयसोलेटची प्रक्रिया राबविण्यात देशात दुसरे स्थान मिळविले आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

परमिलियन ६६,४७४ टेस्ट 
महापालिकेने आत्तापर्यंत ८० हजार चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष (परमिलियन टेस्ट) ६७,६८९.३ एवढे आहे. औरंगाबादपेक्षा गोवा शहराचे प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे गोवा एक नंबरवर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा नंबर असून दिल्लीचे प्रमाण ४३,७०८ एवढे आहे. राज्याचे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे कोरोना चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

सोलापूरला देणार १० हजार किट 
एक लाख अॅन्टीजेन किट खरेदी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे. सध्या किटचा तुटवडा असल्याने इतर शहरांमधून मागणी होत आहे. सोलापूरला १० हजार किट दिले जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागासाठीही महापालिका कीट देत आहे, असे प्रशासकांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेचा अॅप पाच शहरात 
औरंगाबाद महापालिकेचा ‘माझे ओरोग्य माझ्या हाती’ हा अॅप पाच शहरात पोचला आहे. मुबंई, पुणे, नाशिक, धुळे, सोलापूर या शहरांनी महापालिकेकडून माहिती घेऊन अॅप सुरू केले व ५० वर्षावरील नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad