esakal | अॅण्टीबॉडी तपासण्यासाठी ५६४ जणांचे घतले रक्त नमुने 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

काही भागात रक्त नमुने देण्यास विरोध झाल्यामुळे नागरिकांनी सिरो सर्व्हेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

अॅण्टीबॉडी तपासण्यासाठी ५६४ जणांचे घतले रक्त नमुने 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्लीप्रमाणे शहरातही सिरो सर्व्हेक्षणाची मोहीम सोमवारपासून (ता. दहा) सुरू करण्यात आली. दिवसभरात ५६४ नागरिकांच्या रक्तांचे नमुने अॅन्टीबॉडी तपासणीसाठी घेण्यात आले. दरम्यान काही भागात विरोध झाल्यामुळे नागरिकांनी सिरो सर्व्हेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महापालिका, घाटी व एमजीएम रुग्णालय आणि भारतीय जैन संघटनेतर्फे सिरो सर्वेक्षणाला तापडिया कासलीवाल मैदानावर सुरवात करण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर भिती वाटते, मात्र अ‍ॅण्बॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आनंदाची बाब आहे. त्यामुळे सहा दिवस ११५ वार्डात चालणाऱ्या सिरो सर्वेक्षणात नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊ चाचणी करून घ्यावी, असे आवाहन यांनी केले.

आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले की, या मोहिमेत प्रत्येक वॉर्डमधून किमान ३५ ते ४० जणांच्या रक्तांचे नमुने घेतले जातील. यावेळी डॉ. शोभा साळवे, डॉ. श्वेता देशमुख, डॉ. अमरीन, डॉ. स्मिता अंदूरकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. सेवलीकर, डॉ. पठाण, डॉ. सिद्धार्थ बनसोड, अ‍ॅड. गौतम संचेती, प्रविण पारख, पारस जैन, पारस चोरडीया, किशोर ललवाणी, अनिल संचेती, राहुल झांबड, प्रफुल्ल श्रीश्रीमाळ, प्रकाश कोचेटा, अमित काला, अभिजित हिरप आणि अमित भोसेकर उपस्थित होते. 

 
पहिल्या दिवशी याठिकाणी सुरवात 
हर्सुल, मयूरपार्क, भिमनगर, आरेफ कॉलनी, गणेश कॉलनी, शिवनेरी कॉलनी, चौधरी कॉलनी, शरीफ कॉलनी, भडकलगेट, भवानीनगर, अल्तमश कॉलनी, सिल्लेखाना, रामनगर, न्यायनगर, संजयनगर-मुकुंदवाडी, जयभवानीनगर, रामकृष्णनगर-काबरानगर, वेदांतनगर, हमालवाडा-सिल्कमिल कॉलनी, भारतनगर-शिवाजीनगर या वॉर्डात पहिल्या दिवशी रक्ताचे नमुने घेण्यात आले. 

जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...

प्रशासकांनी घेतली नागरिकांची भेट 
काही भागात सर्व्हेक्षणाला विरोध झाला. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गणेश कॉलनीत जाऊन नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर रक्त नमुने देण्यास नागरिक तयार झाले. 

अशी केली निवड 
प्रत्येक वॉर्डातील सधन आणि झोपडपट्टी भाग निवडून प्रत्येक दहा घरामागे एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात एक वृध्द, एक तरुण, एक वृध्द महिला, एक तरुणीचा समावेश आहे. पहिल्या दिवशी ५६४ व्यक्तींच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.