आता या कारणामुळे वाढू शकतो कोरोनाचा संसर्ग...

माधव इतबारे
Thursday, 20 August 2020

चार दिवसांनंतर मंगळवारी मध्यरात्री कंपनीने औरंगाबादसाठी फक्त ३५ हजार किटचा पुरवठा केला. उर्वरित १५ हजार किट लवकरच देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. 

औरंगाबद : कोरोनाचा अहवाल तातडीने देणाऱ्या ५० हजार अँटीजेन किट महापालिकेने मागविल्या होत्या. मंगळवारी रात्री (ता.१८) फक्त ३५ हजार किट महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. मागणी जास्त असल्याने किटचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतून अँटीजेन किटला मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. कीटच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात चाचण्यांची संख्या घटली होती. 

महापालिकेने १० जुलैपासून अँटीजेन किटचा वापर सुरू केला आहे. आतापर्यंत एक लाख ५० हजार किट वापरण्यात आल्या आहेत. मात्र, या किट संपल्यामुळे काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे दिल्लीच्या कंपनीकडून पुन्हा ५० हजार नवीन किट मागविण्यात आल्या; मात्र चार दिवसांनंतर मंगळवारी मध्यरात्री कंपनीने फक्त ३५ हजार किटचा पुरवठा केला. उर्वरित १५ हजार किट लवकरच देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. दरम्यान महापालिकेकडील  किट संपत आल्याने चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. आता यापुढे देखील किट वेळेवर मिळाल्या नाहीत तर चाचण्यांची संख्या घटून संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
शहरात बुधवारी (ता.१९) दिवसभरात २,२८५ अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १७६७ अँटीजेन चाचण्यांतून ६६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर ८४९ जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात २७ जण पॉझिटिव्ह निघाले. १२ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये ७९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात ९१८ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३९ जण पॉझिटिव्ह निघाले. 

सारीचे रुग्ण आता तेराशेपार 
सारी रुग्णांची संख्या आता १,३०६ वर गेली आहे. मंगळवारी (ता. १८) ‘सारी’चे १६ रुग्ण वाढले. १३०६ पैकी १२९८ रुग्णांचे लाळेचे नमुने घेण्यात आले होते. यातील ४८२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. ८१० जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सहाजणांचे अहवाल येणे बाकी आहे. सारी या आजारामुळे आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे.  

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सात लाख जणांचे स्क्रीनिंग 
कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेने स्क्रीनिंग सुरू केले होते. आतापर्यंत विविध स्क्रीनिंग सेंटरवर सात लाख १५ हजार ५५२ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यात तीन हजार ८२७ संशयित रुग्ण आढळले. तीन हजार ८२७ पैकी दोन हजार ७३४ जण पॉझिटिव्ह निघाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad