आयुषच्या ‘पीजी’ परीक्षेबाबत वाढली चिंता...

संदीप लांडगे
Tuesday, 18 August 2020

नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा (एआयएपीजीईटी) २९ ऑगस्टला घेण्याचे निश्‍चित केले आहे. ही परीक्षा देशभरात २ हजार २७४ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद ः नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षा (एआयएपीजीईटी) २९ ऑगस्टला घेण्याचे निश्‍चित केले आहे. ही परीक्षा देशभरात २ हजार २७४ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यासाठी ५० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी, पालकांकडून केली जात आहे. 

 

दरवर्षी एप्रिल, मेदरम्यान एनटीएमार्फत एआयएपीजीईटीच्या परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात दोन महिने पुढे परीक्षा ढकलण्यात आली. २९ ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी बारादरम्यान ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. त्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्धा आणि युनानी हे चार विषय असतील. देशभरात एकूण २ हजार २७४ वेगवेगळ्या केंद्रावर घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी ५० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून पीजी व एमएससाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती www.nta.ac.inwww.ntaaiapget.nic.in या संकेतस्थळावर आहे. 

यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला...

विद्यार्थ्यांपुढे समस्या 
२९ ऑगस्टला होणाऱ्या एआयएपीजीईटीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे केंद्र देण्यात आले होते. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत, म्हणून अकोला व चंद्रपूर ही दोन नवी परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीची वाहतूक सध्या बंद आहे. 

तसेच कोरोनामुळे अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. हॉटेल्स, वाहतूक बंद असल्यामुळे राज्यभरातील विविध जिल्हा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणे अशक्य आहे. तसेच अनेक बीएएमएस, बीएचएमस डॉक्टर्स कोरोना वारीयर्स म्हणून काम करीत आहेत. त्यातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी? याबाबत एनटीएने विचार करुन एआयएपीजीईटीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भावी एमडी, एमएस डॉक्टर्सकडून केली जात आहे. 

आयटीआय प्रवेशाठी नियमावलीत बदल... अशी आहे नवीन नियमावली 

अद्याप प्रवेशपत्र नाही 
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ तारखेपासून परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपबल्ध करुन देण्यात येणार होते. मात्र, अद्याप ते संकेतस्थळावर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळता यावी, यासाठी ४९ केंद्रांमध्ये वाढ केली आहे. तसेच कोरोनाचे नियम पाळत विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona updates All India AYUSH Post Graduate Examination On 29th August