आधुनिक साधनाने काढल्या कोरोना योद्धा डॉक्टरच्या फुफ्फुसातील गुठळ्या 

मनोज साखरे
Tuesday, 1 December 2020

एमजीएमच्या डॉक्टरांकडून कोरोना योद्धा डॉक्टरवर यशस्वी उपचार 

औरंगाबाद : कोरोनावर उपचार घेतल्यानंतर सुटी होण्याच्या एक दिवस आधी रुग्ण अचानक कोसळला. निदान झाल्यानंतर या रुग्णाच्या फुफुसात गाठी तयार झाल्याचे समजले. डॉक्टरांकडे अगदी कमी वेळ होता. परंतू, त्यांनी निर्णय घेत पाच तासांतच ‘पेनुंब्रा थोंबो सेक्शन डिव्हाईस’चा अवलंब करुन फुफुसातील गुठळ्या काढून रुग्णाला जीवदान दिले. हा रुग्ण कोरोना योद्धा डॉक्टर असल्याचेही एमजीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा व उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
रुग्णावर उपचार करणारे डॉ. प्रशांत उदगिरे यांनी सांगितले की, कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये रक्त घट्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यात गाठी तयार होतात. या गाठी पायाच्या, हृदयाच्या किंवा फुफुसाच्या नसात होण्याची शक्यता असते. एमजीएममध्येही असाच एक कोवीड रुग्ण २० ऑक्टोबरला दाखल झाला. हा रुग्ण डॉक्टर होता. सातव्या दिवशी या रुग्णाला दम लागत होता. न्यूमोनिया झाल्यानंतर त्याचे रुपांतर ‘सायटोकीन स्ट्रोम सिन्ड्रोम’ मध्ये झाले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उपचारानंतर रुग्णाला अतीदक्षता विभागातून खोलीत हलविण्यात आले. सुटी होण्याच्या एक दिवस आधी रुग्ण अचानक कोसळला व बेशुद्ध झाला. रुग्णाची रक्तातील ऑक्सिजन पातळी साठ टक्क्यांपर्यंत खाली गेली. रुग्णाला खूप दम लागत होता. त्या रुग्णाला तातडीने आयसीयूत हलविले. त्यांना ‘एनआयव्ही’ व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची सीटी पल्मोनरी अन्जिओग्राफी केली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यानंतर एमजीएमचे डॉ. राहूल चौधरी, डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. अभिन छाबडा, डॉ. राहूल पाटणी यांनी निर्णय घेत गाठ विरघळण्याचे इंजेक्शन दिले व नसांतील रक्ताच्या गुठळ्या काढण्याचे ‘पेनुंब्रा थोंबो सेक्शन डिव्हाईस’द्वारे गुठळ्या काढण्यात आल्या. पाच तासांच्या परिश्रमानंतर रुग्णाच्या नसा पूर्णपणे उघडल्या. हळुहळु रुग्णाचा रक्तदाब व ऑक्सिजन पातळी पूर्ववत होऊ लागली. रुग्णाची स्थिर झाल्यानंतर आज रुग्णाला सुटी करण्यात आली. औरंगाबादेत अशी उपचार पद्धती पहिल्यांदाच या उपकरणाद्वारे झाल्याचे डॉ. प्रशांत उदगिरे यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warrior doctors lung clots removed with modern tools Aurangabad news