सिरो सर्वेक्षणातून मिळेल संसर्ग अन् इम्युनिटीचा निष्कर्ष... काय आहे ही पद्धत? वाचा खास रिपोर्ट...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आता सिरो सर्वेक्षण होणार आहे. यातून शहर व जिल्ह्यात समूहांमध्ये कोरोनाचा किती प्रादुर्भाव झाला व संसर्गाचे प्रमाण किती, हे समजणार आहे. संसर्गाचे प्रमाण जेवढे जास्त तेवढी इम्युनिटी वाढेल, या सूत्रानुसार सामुदायिक इम्युनिटीचे प्रमाण कळू शकणार आहे. 

मूलभूत संकल्पना
घाटी रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार, साधारणतः शंभर लोकांत ८० ते ८५ लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. ते आपोआप बरे होतात. १० ते १५ लोकांना उपचाराची गरज भासते. संसर्ग झालेल्या सर्व व्यक्तीत अँटीबॉडीज तयार होतात. ज्यांना लक्षणे नाहीत; पण शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर याचा अर्थ अशा व्यक्तींनाही कोरोना होऊन ते वरचेवरच बरे झाले, असा होतो. शिवाय अँटीबॉडीज असंख्य व्यक्तीत काहीअंशी तयार झाल्या असतील तर साथ आटोक्यात येऊ शकते. 

सिरो सर्वेक्षणाचे टप्पे 

  • शहरात ११५ वॉर्डांत साडेचार हजार सॅम्पल घेणार. 
  • वाळूजला एक हजार, ग्रामीणमध्येही सॅम्पल घेणार. 
  • एका टेस्टचा साधारणतः तीन हजार रुपये खर्च असतो. 
  • नागरिकांच्या सहमतीने 3 ते 5 मिलि. रक्तनमुने घेतात. 
  • घाटीच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये हे नमुने पाठविले जातील. 
  • रक्तनमुन्यातील प्लाझ्मा काढून रक्त सेंट्रीफ्युज करतात. 
  • त्यानंतर ब्लड सीरम (रक्तद्रव्य) ची टेस्टिंग होते. 
  • त्यावरून शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण काढता येते. 
  • व्यक्तीत अँटीबॉडीज तयार झाली की नाही हे समजेल. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काय होईल लाभ? 
कोरोना महामारीच्या या काळात आपण आजारी पडलो नाही, लक्षणेही नव्हती; पण आपल्याला लागण झाली होती की नाही हे यातून समजेल. अर्थात कोरोनाची लागण किती लोकांना होऊन गेलेली आहे, हे लक्षात येईल. या अभ्यासातून काही निष्कर्ष काढता येतील. त्यावरून उपाययोजनांच्या दिशाही लक्षात येतील. 

तरीही घ्यावी लागेल काळजी... 
सिरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीही आले तरी लोकांनी निष्काळजी करून चालणार नाही. यातही काय उपाययोजना कराव्यात याचा विचार करावा लागेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फार्मिंग इंडियाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या म्हणण्यानुसार सिरो सर्वेक्षण झाले व त्याचे अहवाल जरी सकारात्मक आले तरीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काय आहे सिरो, ते कसे केले जाते? 
सिरो-प्रचलित अभ्यासानुसार, संसर्गजन्य रोगाविरुद्ध अँटीबॉडीज विकसित करणाऱ्या लोकसंख्येला अथवा समुदायातील लोकांना ओळखण्यासाठी सेरोलॉजी (रक्त सीरम) चाचणी केली जाते. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिल्ली सरकारच्या सहकार्याने २७ जून ते १० जुलै या कालावधीत तसेच नंतर धारावीतही सिरो सर्वेक्षण केले होते. दिल्लीच्या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने बाधित व्यक्तींना लक्षणे नव्हती असेही दिसून आले होते. 

सिरो सर्वेक्षणात रक्तनमुने लक्षणे नसलेल्या व्यक्तींचेच घेतले जातात. त्यातून समूहात किती प्रादुर्भाव झाला, किती टक्के हे प्रमाण आहे, कोणत्या भागात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे, विविध भागांत किती संसर्ग झाला हे समजेल. या सर्वेक्षणातून भविष्यात काय उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत हेही कळेल. 
डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय 

संपादन ः प्रवीण मुके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com