फुलंब्रीच्या लाचखोर कृषी सहायकाला अटक 

सुषेन जाधव
Thursday, 1 October 2020

पोक्रा योजनेतून शेततळ्याचे अनुदान जमा केल्याचे मागितले बक्षिस 

औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (POCRA) योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केल्याचे बक्षिस (मोबदला) म्हणून २८ हजार रुपये लाच घेणाऱ्या कृषी सहायकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. हर्षल निवृत्ती येवले (२३) असे त्या लाचखोर सहायकाचे नाव तो फुलंब्री तालूका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत होता. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या प्रकरणी तक्रारदार शेतकऱ्याच्या भावाच्या नावावर पोक्रा योजनेंतर्गत शेततळे करण्यात आले होते. त्यासाठीचे १ लाख ६७ हजार ९५० रुपये अनुदान शासन नियमानुसार शेतकऱ्याच्या खात्यात जमाही करण्यात आले मात्र हे सोईस्कर पार पाडल्यामुळे कामाचा मोबदला (बक्षिस) म्हणून कृषी सहायक येवले याने शेतकऱ्याला लाच मागितली. तडजोडी अंती २८ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एसीबीने दखल घेत शहानिशा करुन सापळा लावला. दरम्यान गुरुवारी (ता.१) फुलंब्री तालूक्यातील पाल फाट्याजवळ शेतकऱ्याकडून मध्यस्थीद्वारे २८ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये पंडीत कडुबा जेठे (रा. शेरुडी, ता. फुलंब्री) या मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. दोघा आरोपीविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली. त्यांना बाळासाहेब राठोड, गोपाल बंरडवाल, राजेंद्र सिनकर व बागुल यांनी सहाय्य केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corrupt agricultural assistant arrested Fulambri news