मराठवाड्यासाठी कोरोना लसीचे एक लाख ३० हजार डोस दाखल, शनिवारी लसीकरणास होणार सुरुवात

प्रकाश बनकर
Thursday, 14 January 2021

औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांसाठी सहा हजार ४५० व्हायल्स दाखल झाले आहेत. एका व्हायल्समधून दहा डोस देता येणार आहे.

औरंगाबाद : कोरोनाला रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात आलेली ‘कोव्हिशिल्ड’ लस बुधवारी (ता.१३) मराठवाड्यात दाखल झाली. यात एक लाख ३० हजार ५०० डोस मराठवाड्यासाठी आले आहेत. यात औरंगाबाद विभागासाठी ६४ हजार ५००, तर लातूर विभागासाठी ६६ हजार डोस आले आहेत. शनिवारी (ता.१६) लसीकरणास प्रारंभ होणार आहे. दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्‍ह्यात कोव्हिशिल्ड लस पाठविण्यात आली आहे.

बहुप्रतीक्षित कोव्हिशिल्ड लस सकाळी साडेनऊ वाजता शहरातील सिडको एन-५ येथील आरोग्य उपसंचालक व प्रशिक्षण केंद्रात अरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, केंद्राचे प्राचार्य अमोल गीते यांच्या उपस्थितीत लसीचे बॉक्स उतरविण्यात आले. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, लातूर इतर जिल्ह्यांत रवाना झाले. औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांसाठी सहा हजार ४५० व्हायल्स दाखल झाले आहेत. एका व्हायल्समधून दहा डोस देता येणार आहे. सहा हजार ४५० व्हायल्समधून या चार जिल्ह्यांसाठी ६४ हजार ५०० डोस देता येणार आहेत. या ६४ हजार डोसमधून औरंगाबाद शहरासाठी २० हजार डोस तर ग्रामीण भागासाठी १४ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी फोडले नाराळ
शहरात लस दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्ह्यात ती लस पाठविण्यात येणार होती. मात्र लसचे कंटनेर हे सकाळी साडेनऊ वाजता दाखल झाले. लसीचे बॉक्स उतरविल्यानंतर कंटनेर उर्वरित लसीचे बॉक्स घेऊन दुसऱ्या जिल्‍ह्याकडे रवाना झाले. सर्व झाल्यानंतर उशिराने जिल्हाधिकारी लस उतरविण्याच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर त्‍यांनी नारळ फोडले. यावेळी प्राचार्य डॉ. गीते, यांच्यासह जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ शेळके उपस्थित होते.

औरंगाबादच्या आणखी ताज्या बातम्या वाचा

 

शहर डोस
औरंगाबाद ३४ हजार ५००
जालना १४ हजार ५००
परभणी ९ हजार ५००
हिंगोली ६ हजार ५००
लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड ६६ हजार
एकूण १ लाख ३० हजार ५०० डोस

 

 

Edited - Ganesh Pitekar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covishield Vaccine Above One Dose Arrived In Marathwada Aurangabad Latest News