क्रिकेटपटू अझरुद्दीनवरील  गुन्हा रद्द करण्याच्या हालचाली 

मनोज साखरे
Thursday, 30 January 2020

विदेश दौऱ्यावेळी क्रिकेटपटू मोहंमद अझरुद्दीन यांची तिकिटे काढली गेली खरी पण पैसे देण्यावरून चालढकल झाली व त्यात औरंगाबादच्या शहाब यांचे पैसे अडकले. परंतु याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वेगाने हालचाली करून स्वीय सहायकाने थकीत रक्कम शहाब यांना दिली. 

औरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनसह इतर काही जणांविरुद्ध विदेश यात्रेपोटी टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे 21 लाख रुपये थकविल्याप्रकरणी 22 जानेवारीला गुन्हा नोंद झाला.

त्यानंतर आठवडाभरातच अझरुद्दीन यांच्या स्वीय सहायकाने ट्रॅव्हल्स मालकाला धनाकर्ष दिला. त्यामुळे हा गुन्हा गैरसमजुतीने झाला असा शेरा देत पोलिसांनी तो "सी फायनल' (क वर्गात) करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, क्रिकेटपटू मोहंमद अझरुद्दीन, सुदेश अव्वेकल, मुजीब यांच्याविरुद्ध औरंगाबादेत गुन्हा नोंद झाला होता. औरंगाबादेतील दानिश टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे मोहंमद शहाब मोहंमद याकूब (वय 49, रा. लेबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती.

त्यानुसार विमान तिकिटे बुक करून त्याचे वीस लाख 96 हजार 311 रुपये थकविल्याने मोहंमद शहाब यांनी तक्रार दिली व त्यात मोहंमद अझरुद्दीन व इतरांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंदही झाली होती. 

येथे अडले होते घोडे 
पोलिस सूत्रांनी माहिती दिली की, मोहंमद अझरुद्दीन सतत इव्हेंटमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांची तिकिटे आयोजक काढतात, तर कधी त्यांचे स्वीय सहायक काढतात.

विदेश दौऱ्यावेळी त्यांची तिकिटे काढली गेली खरी पण पैसे देण्यावरून चालढकल झाली व त्यात औरंगाबादच्या शहाब यांचे पैसे अडकले. परंतु याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वेगाने हालचाली करून स्वीय सहायकाने थकीत रक्कम शहाब यांना दिली. 

गुन्हा "सी फायनल' 
करण्याची प्रक्रिया 

अझरुद्दीन यांच्या नावे विमान तिकिटे काढण्यात आल्याने त्यांचे नाव फिर्यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पण पैसे देण्यात आल्याने गुन्हा गैरसमजुतीने दाखल झाला, यात "क' समरी करण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

"सी फायनल' म्हणजे काय? 
"सी फायनल' म्हणजे गुन्हा "क' वर्गात समाविष्ट करणे. "क' वर्गात गुन्हा समाविष्ट केल्यानंतर या प्रकरणात अटक होत नाही व दोषारोपपत्रही तयार केले जात नाही. तो गुन्हा फायनल झाला असा शेराही त्यात असतो, अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. 

हेही वाचा - 

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Azharuddin The Motion to Cancel The Offence