औरंगाबाद जिल्ह्यात सापडतात पोट चिरलेल्या अवस्थेतील हरिण, काळवीट; कस्तुरीच्या तस्करीची शक्यता

हबीबखान पठाण
Wednesday, 18 November 2020

दिवसेंदिवस पाचोड (ता.पैठण) परिसरात पोट चिरल्याने मृत झालेल्या हरिण व काळवीटच्या संख्येत कमालीची वाढ होत चालली आहे. यामागे मृगाच्या नाभितील कस्तुरीची तस्करी होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद) : दिवसेंदिवस पाचोड (ता.पैठण) परिसरात पोट चिरल्याने मृत झालेल्या हरिण व काळवीटच्या संख्येत कमालीची वाढ होत चालली आहे. यामागे मृगाच्या नाभितील कस्तुरीची तस्करी होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. रविवारी (ता.१५) सानपवाडी व सोनवाडी (ता.पैठण) शिवारातील शेतामध्ये काळविट मृतावस्थेत आढळले. त्यांचे पोट फाडलेले तर त्याजवळ पडलेल्या पोत्यात काळविटांची शिंगे व तीक्ष्ण हत्यारे असल्याने कस्तुरीच्या तस्करी प्रकरणाला बळकटी मिळते.

तरुणाने मित्रांच्या मदतीने आपल्याच घरात केली चोरी, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

दोन वर्षांपासून पैठण तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बागायती क्षेत्रात वाढ होण्यासोबतच सर्वत्र घनदाट जंगलातही वाढ होऊन वनराई बहरली. बारमाही पिकेही जोमात आली. त्यामुळे परिसरात कधीही दृष्टीस न पडणारे वन्यप्राणी हरिण, काळवीट, मोर, ससे, बिबटे, तडस, रानडुकर दृष्टीस पडत आहे. हरिणांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याच्या बेंबीतील सुगंधी कस्तुरीची तस्करी करणारी टोळी या भागात सक्रिय झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हरणाच्या बेंबीत असणाऱ्या या दुर्मिळ सुगंधी कस्तुरीला मोठी मागणी असून बाजारात त्याची लाखो रुपये किंमत आहे. या भागात हरणाची वाढती संख्या, वनविभागाची उदासिनता अन् नागरिकांचा दुर्लक्षितपणा लक्षात घेऊन त्याच्या पोटातून कस्तुरी काढणाऱ्याची टोळी या भागात सक्रिय झाली असावी.

हे गत दोन वर्षांपासून पाचोडसह (ता.पैठण) परिसरात सतत सापडून येणाऱ्या मृत हरिण व काळविटावरून स्पष्ट जाणवते. आजपावेतो मृत सापडलेल्या हरिण व काळविटाचे नाभीजवळच पोट चिरलेले पाहावयास मिळाले. यावरून मृगाच्या पोटातील कस्तुरीची तस्करी होत असल्याच्या संशयाला आणखी बळकटी प्राप्त होते. एवढेच नव्हे तर रविवार ते मंगळवारपर्यंत तीन काळविट परिसरात पोट चिरलेल्या अवस्थेत सापडून आले. तसेच मृत काळविटाच्या जवळ एक पोते सापडून आले. ज्यात काळविटाचे शिंगे, तीक्ष्ण हत्यारे भरलेली होती. पोट फाडून कस्तुरीचा'शोध घेतल्यानंतर हरिण-काळविट मरण पावते.

त्यानंतर हे मृत हरिण महामार्गावर आणून टाकत अज्ञात वाहनाच्या धडकेने हरिणचा मृत्यू झाल्याचे दाखविले जाते. एवढेच नव्हे तर आडवळणी व दुर्लक्षित भागात कस्तुरीचा शोध घेतल्यानंतर मृत हरिण तेथेच टाकून काळविटाचे मारेकरी पसार होतात. क्वचित थोड्याफार घटना शेतात अन्नपाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरिणावर तूर, कापसाच्या पाट्याला जप धरून बसलेल्या कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने होतात. यांत जखमी अवस्थेत सापडलेले हरिणाचे प्रमाण अत्यल्प आहे. रविवारी (ता.१५) दुपारी सानपवाडी व सोनवाडी तर सोमवारी(ता.१६) देवगाव शिवारातील शेतात एक काळविट मृतावस्थेत सापडल्याने ग्रामस्थांनी वन विभागास माहिती दिली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत काळविट ताब्यात घेवून उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. सदरील हे काळवीट दीड-दोन वर्ष वयाचे असून त्याचे पोट चिरलेले असल्याने नेमका प्रकार काय हे अनुत्तरीत आहे. तर यापूर्वी परिसरातील खादगाव, रांजनगाव दांडगा, पाचोड, थेरगाव, हर्षी, दादेगाव, सोनवाडी, खादगाव शिवारात शेकडो मोर, लांडोर व सशाची शिकार करून राजरोस पार्ट्या शिजल्याचे सर्वज्ञात आहे.

गोपीनाथ मुंडेंचा सैनिक म्हणून निवडणुकीत उतरतोय, रमेश पोकळेंचे सूचक विधान; बोराळकरांसमोर आव्हान

मात्र यापासून वनविभाग मात्र अनभिज्ञ आहे. यासंबंधी वनविभागाने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. यासंबंधी वन्यजीवप्रेमी धनराज भुमरे म्हणाले,'दोन वर्षापासून पैठण तालुक्यात वन्यजीवांची राजरोस शिकार होऊन हरिण, मोर, घोरपड, तितरची हत्या केली जात आहे. यासंबधी वनविभाग अंधारात असून संबंधीत तस्करांचे अवैध वृक्षतोड करणाऱ्या मार्फत "जुळते" घेतले जाते. दररोज मरणाऱ्या हरिणाचे पोटच कसे फाडले जाते. यामागे अवश्य 'कस्तुरी' रॅकेट असु शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालय न सांभाळता स्वतः गावपातळीवर जाऊन शाहनिशा करावी. अन्यथा छेडण्यात येईल.

वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी झाले शहरवासी : पैठण तालुक्यात अवैध वृक्षतोड व वन्यजीवाची हत्या रोखण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह एक वनपाल,सहा वनरक्षक व अकरा वन कर्मचारी अशा एकोवीस जणांची नेमणूक करण्यात आलेली असून पैठणसह आडुळ,पारुंडी, दरेगाव, ब्राम्हणगाव, कचनेर, निलजगाव ही मुख्यालय आहेत.मात्र हे सर्वजण मुख्यालय सोडून औरंगाबादहून कामकाज सांभाळत असल्याने वन्यजीव, वृक्षासह नागरिकांची सुरक्षितता हरवली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deers Dead Bodies Found In Aurangabad District