मराठवाड्यातील बँकांच्या २७ शाखा होणार कमी

प्रकाश बनकर
Wednesday, 1 April 2020

देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद: देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या चार बँकांची निर्मिती ही आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून या दहा बँकांपैकी अनेक बँकांच्या शाखा इतर बँकांमध्ये विलीन होणार आहेत. मराठवाड्यात या एकत्रीकरणामुळे २७ शाखा कमी होणार आहे. 

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्याचवेळी सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या शाखा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत. अलाहाबाद बँकेच्या शाखा इंडियन बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जाणार आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बँक कर्मचारी संघटनांनी बँकांचे बहुचर्चित एकत्रीकरण याला विरोध केला; मात्र त्यांना यश आले नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड आणि हिंगोली येथील या शाखांचे वेगवेगळ्या बँकेत विलीनीकरण होणार आहे. 
रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक योगेश दयाल यांनी जारी केलेल्या जाहिरातीनुसार, अलाहाबाद बँकेच्या सर्व शाखा एक एप्रिल २०२० पासून इंडियन बँकेमध्ये विलीन करण्यात येणार आहेत. याशिवाय आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा एक एप्रिल २०२० पासून युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत. 

ग्राहकांना येणाऱ्या अडचणी 
विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांना नवीन अकाऊंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवीन अकाऊंट किंवा IFSC कोड मिळेल, त्यांना ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनी, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन स्कीम इत्यादी ठिकाणी अपडेट करावी लागेल. SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इन्स्ट्रक्शन फॉर्म भरावा लागेल. त्याचप्रमाणे ग्राहकांना नवीन चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देण्यात येण्याची शक्यता आहे. एफडी किंवा आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही परिणाम होणार नाही. ज्या व्याजदरांवर ग्राहकांनी घर कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलं आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सध्या कोरोनाची गंभीर स्थिती देशात सुरू असताना बँकांच्या एकत्रीकरणाची घाई केंद्र सरकारने करण्याची गरज नव्हती; मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करण्याचा अट्टहास सुरू आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. 
-देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन 

एकत्रीकरणामुळे या शाखा होणार कमी 

ओरिएंटल बँक ६ शाखा
युनायटेड बँक ऑफ इंडिया १ शाखा 
सिंडिकेट बँक ३ शाखा 
आंध्रा बँक  ४ शाखा 
कॉर्पोरेशन बँक ३ शाखा 
अलाहाबाद बँक १० शाखा 

सध्या कोरोनाची गंभीर स्थिती देशात सुरू असताना बँकांच्या एकत्रीकरणाची घाई केंद्र सरकारने करण्याची गरज नव्हती; मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करण्याचा अट्टहास सुरू आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. 
-देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different National Banks Branches To Be Close In Marathwada Region