रात्रीतून जिल्हा बॅंकेची शाखा गायब!

प्रकाश बनकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

दोन वर्षांपूर्वी याला विरोध झाला होता. त्यानंतर बॅंकेचे स्थलांतर थांबले होते. आता पुन्हा गावकऱ्यांना विश्‍वासत न घेता थेट बॅंकेचे स्थलांतर करण्याचा प्रकार करण्यात आला.

औरंगाबाद : शनिवारी बॅंक गावातच होती. रविवारी मात्र बॅंकच दिसेना. सुटीचा दिवस बघून बॅंकेची शाखा रातोरात गायब करण्यात आली! या प्रकाराने गावकरीही संतप्त झाले. फुलंब्री तालुक्‍यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पीरबावडा शाखेबाबत रविवारी (ता.12) हा प्रकार घडला.

दोन वर्षांपूर्वी याला विरोध झाला होता. त्यानंतर बॅंकेचे स्थलांतर थांबले होते. आता पुन्हा गावकऱ्यांना विश्‍वासत न घेता थेट बॅंकेचे स्थलांतर करण्याचा प्रकार करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी (ता.14) निदर्शने केली. 

वाचून तर बघा : वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 

शाखेच्या स्थलांतरावरून चांगलेच राजकारण तापले

ऑगस्ट 2018 मध्ये तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजुरेश्वर कल्याणकर यांच्या कार्यकाळात पीरबावडा शाखेच्या स्थलांतरावरून चांगलेच राजकारण तापले होते. तेव्हा गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून बॅंकेला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. बॅंक स्थलांतरानंतर गावाच्या बाहेर जाणार होती. यामुळे गावकऱ्यांना अडचणीचे होणार होते. या शाखेचे स्थलांतर होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी 18 जून 2018 रोजी रास्ता रोको आंदोलन केले. तेव्हा बॅंकेचे स्थलांतर होणार नाही असे लेखी आश्वासन बॅंकेच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 20 ऑगस्ट 2018 रोजी ग्रामस्थांनी उपोषण केले. तेव्हाही बॅंकेने लेखी आश्वासन दिले.

हेही वाचा -मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

आजपर्यंतही हा वाद कायम आहे.असे असतानाही बॅंकेच्या संचालकांनी रविवारी रात्रीतून शाखेचे स्थलांतर करत गावकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या शाखेंतर्गत येणाऱ्या दहा गावांतील गावकऱ्यांनी सोसायटी व ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थलांतराला विरोध केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. 

हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

शेकडो ग्रामस्थ सहभागी 
गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता बॅंकेचे मुख्यालय गाठले. त्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. परंतु, बराच वेळ झाल्यानंतरही नितीन पाटील न आल्याने आंदोलकांनी बॅंकेचे सरव्यवस्थापक शिंदे यांना निवेदन दिले. ही बॅंक स्थलांतर केल्याने नागरिकांना बॅंकेत ये-जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बॅंक पूर्वीच्या ठिकाणीच सुरू ठेवावी नसता बॅंकेला कुलूप लावू असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

बॅंकेच्या स्थलांतराला केवळ टपरी चालकांचा विरोध 
आम्ही जिल्ह्यातील 50 शाखांचे स्थलांतर केले. तेव्हा कुठेच विरोध झाला नाही. मात्र या गावात टपरी चालक काही लोकां स्वार्थासाठी विरोध करताय. या विषयी सर्व संचालकांचा ठराव घेऊन हा निर्णय झाला. यासाठी नवीन जागेचा तेवढे भाडे असणार आहे. यासाठी आठ लाखाचे फर्निचर केले आहे. सर्व सुविधा आहे. वीज मोफत मिळणार आहे. काही टपरी चालकांवर परिणाम होणार असल्यामूळेच विरोध आहे. या गावातर्फे कोणत्याही गोष्टीसाठी उपोषण करण्याची सवय आहे. बॅंकाचे व इतर दहा गावाचे हित पाहून निर्णय घेतला आहे. ही बॅंक दिवस हलवली आहे. 
- दमोदर नवपूते, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक. 

ठराविक लोकांच्या हितासाठी बॅंकेचे स्थलांतर 
पीरबावडा येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेच्या स्थलांतरामूळे एक किलोमीटरपर्यंत नागरिकांचा आता पायपीट करावी लागणार आहे. हे स्थलांतर गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही दोन वेळा थांबविले. या विषयी सुरेश पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्रही आहेत. तरीही स्थलांतर करून गावातील लोकांना त्रास कसा होईल,हेच काम यातून केले आहेत. काही लोकांचे हित जोपाण्यासाठी ही बॅंक हालविण्यात आली आहेत. हे स्थलांतर थांबणे गरजचे आहेत. 
- जगन्नाथ काळे, कॉंग्रेस नेते, तथा अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Bank Branch Disappears Overnight! Aurangabad Breaking News