एकेकाळी प्रतिष्ठेच्या असलेल्या 'डीएलएड' महाविद्यालयांवर घरघर करण्याची वेळ !     

संदीप लांडगे
Wednesday, 16 September 2020

निम्म्या जागांसाठीच आले अर्ज 

औरंगाबाद : कधी काळी डीएलएड (डीएड) प्रवेशासाठी रांगा लागायच्या. पण आता या महाविद्यालयांना घरघर लागली आहे. विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेवटी घटका मोजणाऱ्या महाविद्यालयांसमोर कोरोनामुळे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयात प्रवेशाच्या दोन हजार दोनशे जागा आहेत. मात्र फक्त ५० टक्के अर्ज आले आहेत. यात कोट्यातील प्रवेश जास्त आहेत. दोन महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया सुरु असताना खासगी तसेच शासकीय डीएलएड महाविद्यालयांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आठ वर्षापासून शिक्षक भरती झालेली नाही. विद्यार्थी जास्त व जागा कमी यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी आता डीएडकडे कानाडोळा केला आहे. दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकारच्या विविध नियमांमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ८० टक्‍के विना अनुदानित डीएड महाविद्यालये यापुर्वीच बंद झाली आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ डीएड महाविद्यालयामध्ये दोन हजार दोनशे जागा आहेत. असे असताना डीएडसाठी आत्तापर्यंत फक्त ११०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात ८५ डीएलएड महाविद्यालये होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ होती. मात्र सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएलएड झालेले विद्यार्थी बेरोजगार झाले आहे. नोकर भरतीसाठी डीएलएड झालेल्या विद्यार्थ्यांकडून विविध माध्यमांद्वारे आंदोलन सुरु आहे. मात्र, त्यांना न्याय मिळालेला नाही. याचा परिणाम डीएलएड महाविद्यालयांवर झाला आहे. राज्यात १४ हजाराहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी दोन महाविद्यालये होणार बंद! 
दोन वर्षांपूर्वी सरकारने साडेपाच हजार शिक्षकांच्या जागा भरती केल्या होत्या. मात्र कायमस्वरूपी जागा भरती करण्याऐवजी तासिका किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक करून शिक्षण विभाग वेळ मारून नेली. तीन, चार वर्षापासून डीएलएड महाविद्यालयांमधील सरकारी कोट्यातील जागाही भरल्या जात नाहीत. दरम्यान प्रवेश होत नसल्यामुळे दोन महाविद्यालयांनी बंद करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पत्र दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएलएड पदविकेला कमी महत्त्व दिल्याचा परिणाम प्रवेशावर झाल्याचे डीएड समन्वयकांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D.L.Ed colleges did not get students Aurangabad News