
दखल घेताच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : दुचाकीस्वार दोघेजण कुत्र्याला दोरीने बांधून रस्त्याने फरफटत नेत असल्याचा व्हिडिओ शनिवारी (ता. सहा) व्हायरल झाला. यानंतर या घटनेची दखल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत औरंगाबाद पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, दुचाकी क्रमांकाआधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
शुक्रवारी (ता.पाच) दुपारी चारच्या सुमारास अजबनगरातील तिरुपती वॉशिंगजवळ दुचाकीस्वार (एमएच-२०, ९४३६) एका दोरीने एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला बांधून ओढत असल्याचा व्हिडिओ फेससबुकवर आणि ट्विटरवर व्हॉयरल झाला होता. दरम्यान, एका व्यक्तीने हा व्हिडिओ आदित्य ठाकरे यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर टॅग केल्याने त्यांनी व्हिडिओची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाला टवाळखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावरून शनिवारी पीपल फॉर निमल या स्वयंसेवी संघटनेचे पुष्कर भास्कर शिंदे यांनी सकाळी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिस निरीक्षक निर्मला परदेसी यांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली आहे.
होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती
बार फोडून ७० हजारांची दारू चोरीला
औरंगाबाद ः बिअर बारच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी ७० हजार ३६० रुपयांची महागडी दारू लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्हनहिल्स, अपना बाजार येथील हॉटेल कॅस्टल एक्झिक्युटिव्ह बार अॅण्ड रेस्टॉरंटच्या पाठीमागील लोखंडी ग्रील उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. यानंतर मागील दरवाजाची काच फोडून आत शिरलेल्या चोरांनी विविध कंपन्यांची महागडी दारू आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा ७० हजार ३६० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना २७ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश चंद्रभान तेलोरे (३२, रा. संभाजी कॉलनी, सिडको) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गायके करीत आहेत.
मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
शर्टच्या खिशातून मोबाईल लंपास
औरंगाबाद : भाजी खरेदीसाठी जाधववाडीत गेलेल्या फायनान्स वसुली प्रतिनिधीच्या शर्टच्या खिशातील मोबाईल चोराने लांबविला. ही घटना शुक्रवारी (ता. पाच) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. प्रमोद प्रेमलाल खरे (३५, रा. हर्षनगर, बौद्ध विहाराजवळ) हे पहाटे जाधववाडी मंडईत भाजी खरेदीसाठी गेले होते. यावेळी चोराने त्यांच्या शर्टच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल लांबविला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात
दारूसाठी पैसे न दिल्याने तोडफोड
औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मिस्त्रीच्या घरात शिरून त्याच्यासह पत्नी व मुलाला चौघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, मधुकर संपत वेलदोडे यांचा मुलगा विशाल याला परिसरातील विशाल खाडवे, हर्षवर्धन खाडवे आणि शुभम सुरडकर यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला विशाल वेलदोडे याने नकार दिला. त्या कारणावरून तिघांसह एका महिलेने वेलदोडे यांच्या घरात शिरून दांपत्यासह मुलाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली; तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची तोडफोड केली. शरद टी-पॉइंटवर वीरेंद्र प्रकाश कल्याणम (२०, रा. द्वारकानगर, एन-११, हडको) यालादेखील दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वैभव डहाके याने मारहाण केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घरासमोरून दुचाकीची चोरी
औरंगाबाद : घरासमोर उभी असलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने लांबविली. ही घटना २ जूनला सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ठाकरेनगर, एन- दोन, सिडको भागात घडली. विजय सूरजलाल जैस्वाल (वय ५४) यांनी सकाळी घरासमोर दुचाकी (एमएच-२०, ईक्यू-६५७) उभी केली होती. त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोराने हँडल लॉक तोडून लांबविली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
दारू विकणाऱ्या तिघांची मारहाण
औरंगाबाद : कोरोनाची संसर्ग सुरू असल्याने गल्लीत दारू विक्री करायला मनाई करताच तिघांनी कामगाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. पाच) दुपारी दीडच्या सुमारास संजयनगर, मुकुंदवाडी भागात घडली. पोलिस तक्रारीनुसार, विनोद वामन पगारे (२९, रा. गल्ली क्र. दोन, संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी गल्लीत दारू विक्री करणाऱ्या मनोज मगरे, अमोल मगरे व खन्या मगरे यांना विरोध केला. त्याचा राग आल्याने तिघांनी पगारेला शिवीगाळ करून गजाने दोन्ही हातावर मारहाण केली; तसेच त्यांच्या आई-वडिलांना ढकलून दिले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे.
जुन्या भांडणावरून शिवीगाळ
औरंगाबाद : जुन्या भांडणावरून ओळखीच्या तरुणाने महिलेला घरात शिरून शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी (ता. चार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बन्सीलालनगरात घडली. पोलिस तक्रारीनुसार, शुभांगी कैलास दहिवाल (वय २५) यांना जुन्या भांडणावरून घरात शिरून अतुल राजू राव याने शिवीगाळ केली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाण्याची मोटार लंपास
औरंगाबाद : लष्कर तळावरून पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना २७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. छावणीतील नर्सरी मिल्ट्री करिमामध्ये शिरलेल्या चोराने सहा हजारांची पाण्याची मोटार लंपास केली. याप्रकरणी रेजिमेंटचे लष्कर सय्यद नजीर सय्यद सत्तार यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्यापाऱ्याची अठरा हजारांची फसवणूक
औरंगाबाद : कंपनीला ४८ शर्टची ऑर्डर देण्यासाठी १८ हजार ४८० रुपये एनईएफटीद्वारे बँक खात्यावरून दिल्यानंतरही शर्टची ऑर्डर दिली नसल्यावरून लाला वर्ल्ड वाईड या कंपनीच्या मालकाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०१९ रोजी घडला. याप्रकरणी शेख एजाज शेख हबीब (२६, रा. सिद्दिकी कॉम्प्लेक्स, पैठणगेट) या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे करीत आहेत.