नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा हव्या आहेत. कौशल्याधिष्ठित तरुण घडावेत. बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे लौकिकाला साजेशी गती विद्यापीठाने घ्यावी. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, संघटनांनी सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. तसेच सरकारनेच हा विषय अजेंड्यावर घ्यावा, अशी अपेक्षा नामांतर चळवळीत काम करणाऱ्या लढवय्यांनी व्यक्‍त केली आहे. नामविस्तारानंतर रौप्यमहोत्सवी वर्षानंतरच्या विद्यापीठाबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षा.

गौरवाला साजेसे विद्यापीठ घडावे

ऍड. मनोहर टाकसाळ : नामविस्ताराच्या लढाईत अनेकांनी आत्मबलिदान दिले, गोळ्या झेलल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठीच आम्ही नामांतर लढा दिला. नामविस्तार झाला असला तरी सध्याचे नाव तडजोडीतून आले आहे. ज्यासाठी बाबासाहेब झगडले; त्यानुसार विद्यापीठ आणि राज्य सरकार हे दोघेही वाटचाल करीत नाहीत.

शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेल्या कायद्यानुसार त्यांच्याच नावाने असलेल्या विद्यापीठात कामगारांना पगार मिळत नाहीत. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे बाबासाहेबांचे चांगले वर्णन करायचे; पण त्यानुसार ते वागले नाहीत. त्यांच्याच काळात विद्यापीठाची जास्त बदनामी झाली. अस्मितेचा लढा आम्ही लढलोय. त्यामुळे बाबासाहेबांच्या गौरवाला साजेसे विद्यापीठ घडावे, अशी अपेक्षा आहे.

इमारतीसोबतच ज्ञानही वाढायला हवे 

मंगल खिंवसरा : नामांतराच्या 17 वर्षांच्या लढ्यानंतर विद्यापीठाला नाव दिले. त्याच इमारती, त्याच शाखा, तेच तंत्रज्ञान असेल तर यातून कसा विकास होईल? विद्यापीठासोबत शासनाने पुरेशा सुविधा दिल्या नाहीत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत; मात्र तिथे सुविधांची वानवा आहे.

चांगले विद्यापीठ कुठले? असा प्रश्‍न येतो तेव्हा त्यात बाबासाहेबांचे नाव असलेले विद्यापीठ यावे, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. इमारतीसोबतच ज्ञानही वाढायला हवे. ते विस्तारित करणाऱ्या व्यक्‍ती तिथे असायला हव्यात. विद्यापीठ हे राजकारणाचा अड्डा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करू नये. विद्यापीठात मुलींना बंदिस्त करण्यापेक्षा ज्यांच्यापासून धोके आहेत, त्यांना मुक्‍त संचार देण्याचे बंद करा. जागोजाग तक्रारपेट्याही आवश्‍यक आहेत.

शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा

ऍड. उद्धव भवलकर : विद्यापीठ नामविस्ताराला 26 वर्षे उलटून गेली. सामाजिकदृष्ट्या बदल आणि संशोधनाचे कार्य बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात ज्या तऱ्हेने आणि गतीने व्हायला पाहिजे होते, तसे झाले नाही. शासनानेही वेळोवेळी मदत केली नाही. काही गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. त्या मान्यच करायला पाहिजेत. शासन कुठलेही असो, त्यांनी पैसा उपलब्ध करून दिलाच पाहिजे. संविधानानुसार काटेकोरपणे विद्यापीठ चालले पाहिजे. विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहे सुसज्ज असावीत. तरच विद्यापीठातून चांगले नागरिक, अर्थकारणी तयार होतील. जी अपेक्षित होती, ती कामे झाली नाहीत. म्हणजेच ती समाधानकारक नाहीत. बाबासाहेबांच्या लौकिकास साजेशी कामे व्हावीत. 

काही गोष्टी जाणून-बुजून होताहेत 

रमेशभाई खंडागळे : 17 वर्षांच्या संघर्षानंतर विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले. ते नाव हिमालयाएवढ्या उंचीचे आहे. नावाला साजेसे काम व्हावे, अशी इच्छा आहे; मात्र तिथे खालच्या पातळीवरील राजकारण चालते. विद्यापीठाचे जे मेरिट असायला हवे, ते नाही. बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात जाणून-बुजून या गोष्टी केल्या जातात, असा आमचा आरोप आहे.

या ठिकाणी होणाऱ्या तक्रारी नांदेडच्या विद्यापीठाबाबत का होत नाहीत? तसेच उस्मानाबाद उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा देण्याचा प्रयत्नही काहीजण करीत आहेत. या विद्यापीठाला पर्याय पाहिजे म्हणूनच जातीय भावनेतून हे केले जातेय, असा माझा आरोप आहे. हे रोखून या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा, तरच मेरिट मिळेल.

विद्यार्थी संघटनांनीही प्रयत्न करावेत

सुभाष लोमटे : शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयुष्याचे शेवटचे दिवस बाबासाहेबांनी या ठिकाणी व्यतीत केले. त्यानंतर मिलिंदमध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी येऊ लागले. बाबासाहेबांनी काढलेले कॉलेज हा भावनिक भाग होताच. त्यामुळेच ही मागणी आम्हालाही स्वाभाविक वाटली. मराठवाडा मुक्‍तीसाठी लढणारे लोक विभागाला जोडणारे नाव तसेच ठेवण्याच्या मताचे होते; परंतु त्यांच्या आडून अनेक लोकांनी या चळवळीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विनाकारण दोन समाजांत दरी निर्माण झाली. नामविस्तारानंतर बाबासाहेबांचा मानवमुक्‍तीचा विचार जोपासण्याचा प्रयत्न झाला का? यापुढे राज्यघटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी हे विद्यापीठ आघाडीवर राहील. त्यासाठी विद्यार्थी संघटना, प्रशासन प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. 

बाबासाहेबांना शिक्षणाबद्दल तळमळ होती. ते असतानाच औरंगाबादेत "मिलिंद'ची स्थापना केली. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील विद्यापीठ घडावे, असा आमचा मानस आहे. विद्यापीठात संशोधन आणि गुणवत्ता वाढेल, तसेच बदलत्या काळानुसार नवनवे अभ्यासक्रम आणून विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील. एवढेच नाही, तर मराठवाड्यातील जनतेसाठीही हे विद्यापीठ कार्य करेल. 

- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com