‘डीवायएसपी’च्या मुलीचा कुख्यात गुंडासोबत भर रस्त्यात धिंगाणा! 

सुषेन जाधव
Saturday, 24 October 2020

  • दारू पिऊन ‘साजरा’ केला वाढदिवस  
  • व्हिडिओ व्हायरल होताच दोघांना अटक

औरंगाबाद : शहरातील एका कुख्यात गुंडासोबत भर रस्त्यात कार लावून एका तरुणीने दारू रिचवत आपला वाढदिवस ‘साजरा’ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून कुख्यात गुंड शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद (३५, रा. विशालनगर, गारखेडा) आणि त्याचा मित्र मनोज बळीराम जाधव या दोघांना शुक्रवारी (ता.२२) अटक केली. टिपूसोबत भर रस्त्यात धिंगाणा घालणारी तरुणी ही पुणे विभागातील एका पोलीस उपअधीक्षकांची (डीवायएसपी) मुलगी असल्याचे समोर आले आहे. सध्या ती पसार आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात कुख्यात गुंड टिपू आणि त्याच्या पंटरसह एक तरुणी ही गाण्यांवर ठेका धरत नाचत आहे. शिवाय एका हातात सिगारेटचे झुरके घेत आहे तर दुसऱ्या हाताने दारूची बाटली रिचवतांना दिसत आहे. हा व्हिडीओ पोलीस आयुक्त डॉ़. निखिल गुप्ता यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. तेव्हा हा व्हिडिओ पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीतला असल्याचे समोर आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोण आहे टिपू? 
गारखेडा परिसरातील कुख्यात टिपू याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी एका खून प्रकरणात त्याचा समावेश होता. १३ जुलै २०१९ रोजी त्याने प्रमोद दामोदर खाडे याला रात्री मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक करत पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. याशिवाय विनयभंगाचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या काळात ९ ऑक्टोबर २०१९ रोजी स्थानबध्दतेची कारवाई करत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, ३० सप्टेंबर रोजी तो हर्सूल कारागृहातून बाहेर पडला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ती तरुणी पसार 
कुख्यात गुंडासोबत ‘ती’ मनसोक्त नाचली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचताच ती शहरातून गायब झाली आहे. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार सदर तरुणी ही पुणे विभागातील डीवायएसपींची मुलगी आहे. या तरुणीने काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत क्रांती चौकातही गोंधळ घातला होता. त्या वेळी तिला ताब्यात घेण्यात आले होते, असेही सुत्रांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DYSP daughter dances with notorious gangster Aurangabad crime news