CoronaVirus : किरगिझिस्तानात अडकले आठशेवर विद्यार्थी 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 27 May 2020

-मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश 
-अन्य राज्यांची तयारी, महाराष्ट्राचा मात्र निर्णय होईना 

औरंगाबाद ः कोरोनाकाळात किरगिझिस्तान या देशात औरंगाबादसह महाराष्ट्रातील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३० ते ४० विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पालक डॉ. अनिल पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्रासह औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती, धुळे, बीड, जालना यासह महाराष्ट्रच्या विविध भागांतील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. किरगिझिस्तान या देशातील बिश्केक शहर, इशिकुल, औस यासह विविध शहरांत हे विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून हे विद्यार्थी अडकून पडले आहेत. महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातीलही शेकडो विद्यार्थी तेथे आहेत. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

पालकवर्ग चिंतेत ​

बिहार, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा या राज्य सरकारांनी त्यांना आपापल्या राज्यात आणण्याची व्यवस्था केली आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप अशी व्यवस्था केलेली नाही. या विद्यार्थ्यांचे खाण्या, पिण्याची व राहण्याचे गैरसोय होत असल्याने सर्वच पालकवर्ग चिंतेत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील अनेक पालकांनी खासदार, आमदार यांना फोन, मेसेज, ईमेल, ट्वीटरद्वारे संपर्क केलेला आहे; मात्र अद्याप याबद्दल काहीही निर्णय घेण्यात आला नाही. खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अंबादास दानवे यांनीही पाठपुरावा सुरू केल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 

 असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

केंद्राने परवानगी दिली 

अनेक पालक आणि विद्यार्थी यांनी पंतप्रधानांचे कार्यालयीन सचिव श्रीकर परदेशी तसेच किरगिझिस्तान देशातील पोन्नापन येथील भारतीय राजदूत अलोक डिम्री यांना संपर्क केला, त्यावेळी भारत सरकारने परवानगी दिलेली आहे. मात्र जर महाराष्ट्र सरकारने योग्य ती परवानगी दिली आणि योग्य ती वैद्यकीय व्यवस्था केली तरच विद्यार्थ्यांना विमानाने मुंबईत येता येईल असे सांगण्यात आले आहे. 

या विद्यार्थ्यांसीठी बिश्केक शहर येथून भारतातील विविध शहरांसाठी विमान सोडण्यात येणार आहेत; मात्र यामध्ये महाराष्ट्राचा सामावेश नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाही विमानाने मुंबईत आणून आपापल्या गावी सोडण्यात यावे. 
-डॉ. अनिल पाटील चिकटगावकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight hundred students stranded in Kyrgyzstan