जैस्वालांचे अतिक्रमण, जेसीबी खैरेंचा, काय घडले औरंगपुऱ्यात !

माधव इतबारे
Tuesday, 15 September 2020

बीओटीला अडथळा ठरणारे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. औरंगपुऱ्यातील अतिक्रमणावर मंगळवारी कारवाई केली गेली. विरोधामुळे काही काळ औरंगपुऱ्यात तणाव निर्माण झाला. मुळात जैस्वाल यांनी अतिक्रमण केले असून त्यावर महापालिकेला माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी दिलल्या जेसीबीच्या सहाय्याने हातोडा मारण्यात आला. नेमके काय घडले वाचा सविस्तर !    

औरंगाबाद : महापालिकेने औरंगपुरा येथे भाजी मंडईच्या जागेवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी विकासकाला जागा दिली आहे. पण एका अतिक्रमणांमुळे पाच वर्षांपासून हे काम रखडले होते. दरम्यान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी जागेची पाहणी केली व नंतर अवघ्या काही मिनिटात याठिकाणी अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा दाखल झाली. त्यानंतर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान अतिक्रमण हटविण्यास विरोध झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला पांगविल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महापालिकेचे शहरातील बीओटी (बांधा वापरा हस्तांतरित करा) प्रकल्प रखडले आहेत. प्रशासक आस्तिककुमार पांडेय नुकतीच बैठक घेऊन प्रकल्पांचा आढावा घेत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगपुरा येथील व्यापारी संकुलाचे काम जागेच्या वादामुळे पाच वर्षांपासून थांबले आहे. त्यामुळे श्री. पांडेय यांनी मंगळवारी सकाळी कामाची पाहणी केली. ज्या जागेचा वाद सुरू आहे तिथे प्रशासक गेले.

न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट नाही याची खात्री पटताच त्यांनी घटनास्थळी अवघ्या पाच मिनिटांमध्ये जेसीबी मागवून घेतला. दरम्यान मालमत्ताधारक दिलीप जैस्वाल यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. त्यामुळे सिटी चौक पोलिसांची कुमक मागविण्यात आली व हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, विधी सल्लागार अपर्णा थेटे, उप अभियंता जयंत खरवडकर, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक मझर अली, सय्यद जमशीद उपस्थित होते. या कारवाईमुळे औरंगपुरा भाजी मंडई परिसरातील हातगाड्या गायब झाल्या. यावेळी इतर चार ते पाच लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जैस्‍वालांचे अतिक्रमण, जेसीबी खैरेंचा 
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दुष्काळी कामे करण्यासाठी आपल्या निधीतून महापालिकेला जेसीबी दिला आहे. औरंगपुऱ्यातील अतिक्रमण जैस्वाल यांचे आहे. त्यामुळे जैस्वाल यांचे अतिक्रमण काढण्यासाठी खैरेंच्या जेसीबीचा वापर झाला, अशी चर्चा या भागातील नागरिकांत रंगली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खासगी मालमत्ता असल्याचा दावा 
महापालिकेच्या रेकॉर्डनुसार अतिक्रमण असलेली जागा म्हणजे अरुंद गल्ली आहे. मात्र ही जागा आपली खाजगी मालमत्ता असल्याचा दावा दिलीप जैस्वाल यांनी केला. दरम्यान कुंभार वाड्याच्या सुरवातीला ॲड. नूतन जैस्वाल यांची मालमत्ता असून, या मालमत्तेचा काही भाग अतिक्रमणात येतोय का याची तपासणी नगररचना विभागाने केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment obstructing BOT Aurangabad Munciplity News