पिक नुकसानाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना देताना शेतकऱ्याला आश्रू झाले अनावर

संतोष शेळके
Thursday, 22 October 2020

अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्‍यावर असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २१) औरंगाबाद तालुक्यातील हसनाबादवाडी शिवारातील एका डाळिंब फळबागेस धावती भेट देऊन पाहणी केली.

करमाड (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्‍यावर असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २१) औरंगाबाद तालुक्यातील हसनाबादवाडी शिवारातील एका डाळिंब फळबागेस धावती भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी पाच वाजता जालना महामार्गालगतच्या हसनाबादवाडी शिवारातील गट क्रमांक २६९ मधील डाळिंब फळबागेजवळ श्री. फडणवीस यांचा ताफा थांबला. बुधवारच्या पाचव्या व या समारोपाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी श्री.फडणवीस यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते.

रोजगार हमी योजना मंत्री भुमरे यांच्या निवासस्थानापासून धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन सुरू

यावेळी डाळिंब उत्पादक शेतकरी अमोल अंतराये यांनी अतिवृष्टीमुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले. सततच्या पावसामुळे औषध फवारणी वेळेवर न झाल्याने बुरशीजन्य व इतर रोगाने डाळिंब फळांना काळे डाग पडुन उर्वरित आशाही मावळल्याचे सांगतांना श्री. अंतराये यांना आश्रु अनावर झाले होते. यावेळी श्री.फडणवीस यांनी फळबागेची पाहणी करून परिस्थिती अति वाईट असल्याने विरोधीपक्ष म्हणून आम्ही आपल्या पाठीशी असुन लवकरच ठोस मदतीसाठी शासनास भाग पाडणार असल्याचे आश्वासन दिले.

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, ऑनलाइन परीक्षा होणार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान

यावेळी उपस्थित शेतकऱ्‍यांना श्री.फडणवीस यांनी विमा भरला होता का? तो मिळाला का ? अशी विचारणा करून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने श्री.फडणवीस यांना शेतकऱ्यांचे वतीने एक निवेदन देण्यात येऊन तात्काळ नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष सजनराव मते, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भावराव मुळे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये, पंचायत समिती सदस्य अशोक साळुंके, रामकिसन भोसले, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सजनराव बागल यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Becam Emotional To Speaking With Opposition Leader Devendra Fadanvis