तिला म्हणाले, प्राध्यापकाची नोकरी लावतो, १७ लाखही उकळले, शेवटी तिनेच...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

महाविद्यालयात सहायक प्राध्यापकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १७ लाख रुपये उकळ्याप्रकरणी तिघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. मनिष माटे, नितीष चंद्रशेखर आणि परेश चंद्रशेखर देशमुख असे त्यांची नावे आहेत.

औरंगाबाद: महाविद्यालयात सहायक प्राध्यापकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १७ लाख रुपये उकळ्याप्रकरणी तिघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. मनिष माटे, नितीष चंद्रशेखर आणि परेश चंद्रशेखर देशमुख असे त्यांची नावे आहेत.

फसवणूक झालेल्या महिलेने संशयितांनी संगनमताने कुसूंबा (ता. जि. धुळे) येथील नर्मदाबाई नागो चौधरी आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी संबंधित महिलेकडून १७ लाख रुपये उकळले. मात्र महिलेला नोकरी मिळाली नाही.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

त्यामुळे महिलेने नोकरी आणि दिलेल्या पैशांबाबत विचारणा केल्यानंतर तिला नऊ लाख रुपये परत केले. उर्वरित आठ लाख रुपये परत न केल्याने महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तिघांविरोधात तक्रार नोंदविली. या आधारे सिडको पोलिस ठाण्यात वरील तिघांविरोधात गुन्ह्या नोंदवला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत. 

नगरहून बुलेट चोरणारे गुन्हे शाखेच्या जाळ्यात 
औरंगाबाद:
नगरहून बुलेट चोरून आणणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी औरंगाबादेतील कांचनवाडी परिसरात ताब्यात घेतले. नंदू अशोक गरड (रा. तोडली, बिडकीन, ता. पैठण), सुदाम किसन घटे (रा. मांडवा, ता. पैठण) अशी बुलेट चोरांची नावे असून, त्या संशयितांकडून बुलेट जप्त करण्यात आली. 

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

कांचनवाडी भागात बुलेट विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, संदीप क्षीरसागर, संजय जाधव, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख यांनी कांचनवाडी भागात सापळा रचला.

शनिवारी सायंकाळी पोलिस चौकीजवळ बुलेट घेऊन आलेल्या गरड आणि घटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नगर येथून बुलेट चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करून नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

हेही वाचाः हमालानेच लांबविले अडीच लाखांचे दागिने, नविन घरी सामान शिफ्ट करताना मारला डल्ला  

संपादनः सुषेन जाधव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR Registered Against Three Suspect's InThe matter of Deceived by The Lure Of Job