कोम्बिंग ऑपरेशन राबवत चौघा दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या, दोन पसार गुन्हेगारांनाही अटक

Four Robbers
Four Robbers

औरंगाबाद: शहरात मागील महिनाभरापासून वाढत्या घरफोड्या, दुचाकी चोरी, जुगार अड्डे, कुंटणखाने यासारख्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभुमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवत पुंडलिकनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले.

दोन दिवसापूर्वीच दरोड्याच्या तयारीत असणारी पुणे, नगरची टोळी औरंगाबादेत पकडली असतानाच पून्हा चौघा दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे चौघे दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितली. 

अटकेतील चौघा दरोडेखोरांकडून पोलिसांनी जांबिया, तलवार, चाकू, दोरी आणि मिरची पूड जप्त केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून नाकाबंदी आणि गस्त वाढविण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात येत आहे. शनिवारी (ता.१७) रात्री अकरापासून गारखेडा परिसरात पुंडलिकनगर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

रात्री साडेबाराच्या सुमारास गजानननगरात पाच जण संशयितरित्या दोन दुचाकींसह उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. तर त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातून निसटला. त्यावेळी चौघांच्या अंगझडतीतून पोलिसांनी तलवार, जांबिया, चाकू, दोरी आणि मिरची पूड जप्त केली. 

दरोडेखोरांवर आधीच आहेत गुन्हे 
पोलिसांनी यावेळी हितेंद्र नवनाथ वाघमारे (२४, रा. रमाईनगर, हर्सूल), अजय राजकुमार ढगे (२२, रा. सैलानीनगर, हिंगोली नाका, नांदेड), किरण सुदाम शिंदे (२४, रा. गल्ली क्र. ५, गजानननगर, गारखेडा परिसर), आकाश अर्जून चाटे (२०, रा. गल्ली क्र. ४, न्यू हनुमाननगर, गारखेडा) यांना अटक केली. तर त्यांचा साथीदार राहुल उर्फ राणा बाजीराव सोळुंके (२५, रा. घाटी, बेगमपुरा परिसर) हा पसार झाला. हितेंद्र वाघमारे आणि आकाश चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

तसेच नांदेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय ढगे याच्यावर नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, तो फरार झाला होता. कुख्यात गुन्हेगार राहुल उर्फ राणा याच्याविरुध्द विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई रवि जाधव यांच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करत आहेत. 

५० लाखांची खंडणी मागणाराही ताब्यात 
पुंडलिकनगर पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जालन्यातील बीएसएनएल कार्यालयातील कर्मचारी सुजाता नरवडे यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पसार असलेल्या मनोज बळीराम जाधव (३०) याला सिडको, एन-३ भागातून अटक करण्यात आली. तर शटर फोडी प्रकरणातील शेख इरफान शेख लाल याचा साथीदार शेख बबलु याला पकडण्यात आले.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विकास खटके, रावसाहेब मुळे, मीरा चव्हाण, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, दीपक जाधव, रवी जाधव, राजेश यदमळ, प्रविण मुळे, जालिंदर मांटे आणि अजय कांबळे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com