घाटी रुग्णालयात अन्नदानाचा यज्ञ 

gmch aurangabad
gmch aurangabad

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात बहुतांश रुग्ण विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील कानाकोपऱ्यांतून आलेले असतात. त्यांना मदतीसाठी अन्नदात्यांचीही कमतरता नाही. कुणी वाढदिवसासाठी, तर कुणी आई-वडिलांच्या आठवणीसाठी, तर कुणी पुण्याईसाठी अन्नदानाचा हा यज्ञ तेवत ठेवत आहेत. त्यात घाटीचे अन्न भांडार, झुणका-भाकर आणि जैन संघटनेच्या अन्नदानाचे दैनंदिन सातत्य दिसून येते.

घाटीत वर्षाकाठी सुमारे आठ लाख रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील लाखभर रुग्ण भरती होऊन उपचार घेतात. 1177 खाटांच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दीड हजाराहून रुग्ण, त्यांचे नातेवाईक असा पाच ते दहा हजार लोकांचा राबता रात्रंदिवस असतो. शिवाय सध्या शहरातील सर्वाधिक निराधार, निराश्रित लोक घाटीत आश्रयाला थांबलेले दिसतात. हे सर्व लोक अन्नदानावेळी एकत्रित दिसतात. 

चोवीस वर्षांपासून एक रुपयात झुणका-भाकर  
1995 मध्ये युती शासनाच्या काळात घाटीत झुणका-भाकर केंद्राची सुरवात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झाली. तेव्हापासून संजय व राजू भैरव बंधू हे केंद्र चालवतात. एक रुपयात झुणका-भाकर अशी पूर्वी काहीशा अनुदानावरची योजना राज्यभर सुरू झाली. अल्पावधीत ती बंदही पडली. मात्र, गेल्या चोवीस वर्षांपासून घाटीत हे सुरू असलेले झुणका-भाकर केंद्र सध्याचे राज्यातील एकमेव झुणका-भाकर केंद्र आहे. दररोज शेकडो लोक या झुणका-भाकरीवर दवाखान्यात राहण्याची वेळ निभावून नेतात. ज्वारीच्या दरात साधारण सहा-सातपटीने वाढ झाली आहे. मात्र आजही एक रुपयात झुणका-भाकर दिली जात असल्यावर विश्‍वास बसत नाही. राज्यात सध्या दहा रुपयांत "शिवभोजन' योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी होईल की नाही याची चर्चा सुरू असताना 24 वर्षांपासून शहरात कुणी ओळखीपाळखीचे नसताना घाटीत उपचारासाठी आलेल्यांना हे झुणका-भाकर केंद्र आजही गरिबांना आधार ठरतेय. 

रुग्णांसाठीचे आरोग्यदायी अन्न भांडार 
घाटी रुग्णालयात राज्य शासनाकडून रुग्णांसाठी आरोग्यदायी आहार व गरोदर मातांसाठी पोषक आहार दिला जातो. त्यासाठी आहारतज्ज्ञ व स्वयंपाकी, कर्मचारी वर्षभर मेहनत घेतात. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या निगराणीत हे कामकाज सुरू असते. शहर सुरू असो बंद असो, शासकीय सुटी असो, की कितीही अडचणीचा काळ, रुग्णांना नाश्‍ता, दोनवेळचा आहार वेळेवर अन्‌ मोफत मिळणार, हे या अन्न भांडाराचे वैशिष्ट्य आहे.

शासकीय मानकांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार हा आहार दिला जातो. त्याच्या दर्जाची तपासणी वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिष्ठाता वेळोवेळी तपासून सूचना देत असतात. हा आहार वाटप करण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात वॉर्डातील परिचारिका. वॉर्डातील रुग्ण, त्यांना आवश्‍यक पद्धतीच्या आहाराची नोंद वेळेत अन्न भांडाराला दिली जाते. आता या नोंदी ऑनलाइन झाल्याने काम काहीसे सुकर झाले. एका वेळेला हजार ते दीड हजार रुग्णांना मोफत आहार दिला जातो. शिवाय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांनाही हेच अन्न भांडार सेवा देते. वर्षभरातील प्रमुख सणांना कर्मचारी सुटी सोडून रुग्णांना अन्नदानासाठी हिरिरीने मिष्टान्न मेजवानी देतात, हे खास.

मिनी घाटीतही दिला जातो आहार 
अन्न भांडाराचे कंत्राटीकरण झाल्याने मिनी घाटीत कंत्राटदारामार्फत आहार दिला जातो. भरती झालेल्या रुग्णांना वेळेवर आहार पुरवण्यासाठी येथील आहारतज्ज्ञ लक्ष देतात. शिवाय जिल्हा शल्यचिकित्सकही वेळोवेळी अन्नचाचणी करून सुधारणा सुचवतात. दररोज पन्नासहून अधिक रुग्णांना इथे सध्या मोफत दोनदा आहार दिला जात आहे

महावीर रसोई घर रुग्ण नातेवाइकांचा आधार 
सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त 29 मार्च 2019 रोजी भगवान महावीर रसोई घरचे लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून दररोज चारशे लोकांना भाजी, पोळी, मसाले भात आणि शिरा असे भोजन मोफत देण्यात येते. यासाठी जैन व जैनेतर समाजातील व्यक्ती आर्थिक साहाय्य करतात. प्रामुख्याने लग्नाचा वाढदिवस, जन्मदिवसानिमित्त अनेकजण आर्थिक साहाय्य करून सामाजिक पद्धतीने साजरा करतात. एकवेळ जेवणासाठी दाते 4100 रुपये देणगी देतात. साखळी पद्धतीने शेकडो दात्यांच्या देणगीतून हे रसोई घर सुरळीत सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून रसोईघर गाडी 365 दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूसाठी अन्नदान करते. सकल जैन समाजातर्फे अजित ऍलर्ट ग्रुप या रसोईघराची व्यवस्था पाहत आहे. दाते स्वतःही येऊन अन्नदान सेवाभावाने वाटप करतात. अचूक वेळेत येणारी गाडी आणि स्थान निश्‍चित असल्याने वेळेपूर्वीच रांगा लावून गरजू उभे असतात. शिस्त आणि नियमित अन्नदान वाटप होत असल्याने महावीर रसोई घर रुग्ण नातेवाईकांचा आधार बनले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com