औरंगाबाद : कुंभेफळमध्ये कुंभेश्‍वर पॅनलचा विजय, करमाड ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात

संतोष शेळके
Monday, 18 January 2021

कुंभेफळ (ता.औरंगाबाद) येथील कुंभेश्वर ग्रामविकास पॅनलने अकरापैकी दहा जागा जिंकून सलग चौथ्यांदा एक हाती विजय मिळविला.

करमाड (जि.औरंगाबाद) : कुंभेफळ (ता.औरंगाबाद) येथील कुंभेश्वर ग्रामविकास पॅनलने अकरापैकी दहा जागा जिंकून सलग चौथ्यांदा एक हाती विजय मिळविला. यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी ज्येष्ठ संचालक श्रीराम शेळके यांच्या भावजय आणि खरेदी-विक्री संघाचे सभापती आप्पासाहेब शेळके यांचा दारूण पराभव झाला.
कुंभेफळ येथे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत असते. याही वेळी कुंभेश्वर ग्रामविकास व शेतकरी-कष्टकरी ग्रामविकास पॅनलमध्ये लढत झाली.

या भागातील शेंद्रा एमआयडीसीमुळे कुंभेफळसह शेंद्रा कमंगर, शेंद्रा बन, करमाड येथील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेले असते. कुंभेश्वर पॅनलचे नेतृत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेळके, जेष्ठ नागरिक दादाराव पाटील गोजे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामुकाका शेळके व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळे यांनी केले, तर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके आणि खरेदी विक्री संघाचे सभापती आप्पासाहेब शेळके यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले होते.

यावेळी येथील चार वॉर्डातील अकरा जागेसाठी तेवीस उमेदवार उभे होते. येथे नेहमी होणाऱ्‍या दुरंगी लढतीत यावेळी पहिल्यांदाच वॉर्ड क्रमांक चारमध्ये एका महिला उमेदवाराने अपक्ष म्हणून लढत दिली. दरम्यान, सोमवारी लागलेला निकाल कुंभेश्वर पॅनलच्या अपेक्षेप्रमाणे लागला खरा मात्र यात शेतकरी पॅनलचा पार धुव्वा उडाला. स्वतः पॅनल प्रमुखाला आपापल्या जागा तर सोडाच आपले डिपॉझिटही गमवावे लागले. यावेळच्या येथील निवडणुकीचे वैशिष्ट्ये ठरले ते दोनही पॅनलमध्ये तरूणांना दिलेल्या उमेदवारीचे. सोबतच कुंभेश्वर पॅनलने तर एका अविवाहित एकोणावीस वर्षीय तरूणीला उमेदवारी देऊन समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आजच्या निकालानंतर कुंभेश्वर पॅनलच्या समर्थकांनी उमेदवारांना उचलुन घेत एकच जल्लोष केला.

करमाड ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात
करमाड (जि.औरंगाबाद) येथील ग्रामपंचायतीच्या २६ जागांसाठी दोन पॅनलचे २६ तर दोन अपक्ष अशा २८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यात महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने आठ तर भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. यात मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तालुक्यातील धक्कादायक निकालापैकी हा एक धक्कादायक निकाल ठरला. विजयी उमेदवारात कृष्णा उकर्डे, प्रमिला मुळे, कैलास उकर्डे, सुनील तारो, प्रयागबाई कोरडे, अर्चना कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, दत्तात्रय कोरडे, सय्यद सुरय्याबी, जुलेखा मिर्झा , दत्तात्रय उकर्डे आणि सय्यद बुशरा कदीर हे उमेदवार निवडून आले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Results Kumbhefal, Karmad Aurangabad News