
औरंगाबाद: राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस १२ जूनपर्यंत खरेदी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच जूनला राज्य शासन व पणन यांना दिला होता. संबंधित याचिकेवर शुक्रवारी (ता. १२) सुनावणी झाली.
दरम्यान, खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी राज्य शासन आणि कापूस पणन महासंघाला कापूस खरेदी कधी करणार आदीसंदर्भात म्हणणे मांडण्याचे आदेश देत, याचिका १६ जून रोजी सुनावणीस ठेवली आहे. सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले, की संबंधित याचिकाकर्त्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे याचिका निकाली काढण्याची विनंती केली.
दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलांतर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले, की हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नसून राज्यभरातील खरेदी शिल्लक राहिलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या आहे; तसेच अजूनही बहुतांश कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरच उपलब्ध नसून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन तीन दिवस रांगेत थांबावे लागत आहे, शेतकऱ्यांची अन्न, पाण्याची सोय नसून कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अतिरिक्त भाडे द्यावे लागत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
शेतकऱ्यांनो अशी करा तक्रार
शेतकऱ्यांना कापूस खरेदीसंदर्भात असणाऱ्या तक्रारी नोंदविण्यासाठी खंडपीठाने मुभा दिली आहे. तक्रारी अर्ज करताना पीआयएल एसटी न १०६४९/२०२० या याचिकेचा संदर्भ देऊन सातबारा (असेल तर टोकनची प्रत) आदी कागदपत्रे खंडपीठाच्या hcaur.db@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
काय होती याचिका?
परभणी येथील काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदवले नसल्याने अशा शेतकऱ्यांचा कापूस बाजार सामितीने खरेदी करू नये, असे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी यांनी दिले होते. शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. विशांत कदम यांच्या वतीने याचिका दाखल करून जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाला आव्हान दिले होते. सरकारतर्फे ॲड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. कापूस पणन महासंघातर्फे ॲड. एस. टी. शेळके यांनी बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.