पहिलाच पाऊस आला, संसार अन् मुके जीवही घेऊन गेला, औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थिती

सुषेन जाधव
Saturday, 13 June 2020

मृग नक्षत्रातील पेरणीसाठी शेतकरी राजाला पावसाची प्रतीक्षा होती. सोयगाव तालुक्यात गुरुवारी (ता.११) मध्यरात्री पाऊस पडलाही; मात्र कुणाचा संसार घेऊन गेला, तर अनेक मुके जीवही नेले. तर काही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड केलेला कापूस, अद्रक, आर्वी ही पिकेही वाहून गेली.

औरंगाबाद: मृग नक्षत्रातील पेरणीसाठी शेतकरी राजाला पावसाची प्रतीक्षा होती. सोयगाव तालुक्यात गुरुवारी (ता.११) मध्यरात्री पाऊस पडलाही; मात्र कुणाचा संसार घेऊन गेला, तर अनेक मुके जीवही नेले. तर काही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड केलेला कापूस, अद्रक, आर्वी ही पिकेही वाहून गेली.

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

पावसाळ्यात पाऊस येणारच, नुकसान होणारच; पण संसार उघड्यावर पडण्याइतपत हाल व्हावेत असं कुणाला कधी वाटतं का? अशी भावना ईश्‍वर सपकाळ या तरुण प्रयोगशील शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

गुरुवारी रात्री साडेअकरा ते सव्वाएक या वेळेत सोयगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तिडका, नांदगाव, घोसला, उमरवीरा, बहुलखेडा, जरंडी, कंक्राळा परिसरातही पाणी पाणी झाले. पाऊस इतका मोठा होता, की वाकडी येथील पाझर तलाव १५ मिनिटांतच पूर्णपणे भरला होता. सपकाळ यांच्यासह संतोष गायकवाड, दिलीप क्षीरसागर यांचे अद्रक पीक वाहून गेले.

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत
 

पुन्हा करावी लागणार पेरणी

ईश्‍वर सपकाळ (रा. तिडका) म्हणाले, की मी १० एकरावर पूर्वहंगामी कापूस  लावला होता, त्यापैकी वीस गुंठे वाहून गेला. भुसभुशीत गाळाची माती थेट नदीत वाहून गेली. ठिबकही वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, जनावरांसाठी ठेवलेला चारा (भुईमुगाचा पाला, मका कुटी) वाहून गेला. मुळात कपाशीला ठिबक करताना नळ्या ताणून ठोकल्या जातात.

आता मात्र नळी आकुंचन पावत असल्याने पुन्हा ठिबक करताना पाणी कपाशीजवळ पडणार नाही. कपाशीची लागवड केली आहे, त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या शेतातील पाणी, माती वाहून आल्याने कपाशीचे बी मातीत दबले गेले. बहुतांश ठिकाणी एक फुटांचा मातीचा थर बसला तर काही ठिकाणची मातीच वाहून गेल्याने ती कपाशी उगवणार नाही, त्यामुळे नवीन बियाणे लागवड करावी लागणार आहे.

हेही वाचा- CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी

कंक्राळा येथील झोपडपट्टीतील नागरिकांना ग्रामपंचायतीत हलविण्यात आले. काहींचे धान्य वाहून गेले होते. त्यांना सकाळी जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या. साधारण सहा बैल, कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या. त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्याविषयीची मदत तत्काळ देण्यात येणार आहे.
- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव

आमच्याकडे मागच्या ५० वर्षांपासून इतका मोठा पाऊस झाला नाही. तीन एकरांवर आर्वी पीकलागवड केले होते, त्यापैकी साधारण दहा गुंठ्यांवरील पीक वाहून गेले आहे.
- सरस्वतीबाई सपकाळ, शेतकरी तिडका, ता. सोयगाव

हेही वाचा- लाईट जाताच येथे साधा बिनधास्त संपर्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy RainFall In Soygaon Taluka Aurangabd News