राखीव जंगलात उपद्रवींचा धूमाकूळ, खातखेडा-साखरवेलमधील शेकडो झाडांची कत्तल 

अनिलकुमार जमधडे
Monday, 30 November 2020

वनविभागाचे दुर्लक्ष, जनप्रक्षोभ वाढला 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील खातखेडा-साखरवेल येथील राखीव वन जंगलातून राजरोसपणे अनधिकृत रस्ता काढण्यात आला. यामुळे जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन विभाग दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप सुरु झाल्याने हिंस्र प्राण्यांचा मानवी वसाहतीत वावर वाढला आहे. बीड आणि नगर जिल्ह्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. राखीव जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने असे प्रकार वाढीत आहेत. खातखेडा-साखरवेल (कन्नड) शिवारात राखीव वनकक्ष क्र. ७६, गट क्र. १४३ मधील १४७.४२ हेक्टर क्षेत्रात हे वनजंगल आहे. उपद्रवींनी करंजखेड रोड, महानुभाव आश्रमपासून पूर्व पश्चिम डोंगराच्या पायथ्यापासून अंदाजे एक किलोमीटर जंगलातील झाडे तोडून अनधिकृतपणे रस्ता तयार केला आहे. वनक्षेत्रातील शेकडो झाडांची आतापर्यत कत्तल केली आहे. सन २०११ पासून हा रस्ता बंद करावा अशी मागणी येथील राजाराम पवार, विश्वास पवार, स्वप्निल पवार, ऋषिकेश पवार, मंदा पवार, करण पवार, निर्मला पवार, विशाल पवार, आबाराव पवार, बाळु पवार, वैशाली पवार, लक्ष्मीबाई पवार, बंडू पवार, मुनिरखा पठाण, नवनाथ निर्मळ, रमेश निर्मळ, दौलत निर्मळ, सुदाम निर्मळ, प्रभाकर पवार, राजेंद्र पवार अशा शेकडो नागरीकांनी केली आहे. तब्बल दहा वर्षापासून हा रस्ता बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत, तरीही वनविभाग ठोस कारवाई करत नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाटी लावली, कारवाई नाही 
ग्रामस्थांच्या सातत्याने केलेल्या निवेदनामुळे केवळ २६ आँक्टोबर २०२० रोजी नोटीस बोर्ड लावण्यात आला. रस्ता बंद न करता रस्त्याच्या बाजूला पाटी लावली आहे. याठिकाणी प्रवेश करणे, गुरे चराई करणे, आग लावणे, जमिनीचे विच्छेदन करणे, वृक्षतोड करणे यावर बंदी आहे. अशी पाटी लावून वन विभागाने आपली जबाबदारी झटकली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असा केला पाठपुरावा 
-८ फेब्रुवारी २०११ रोजी वनक्षेत्रपाल (पिशोर) यांना निवेदन 
-२७ सप्टेंबर २०१२ रोजी उपवनसंरक्षकांकडे तक्रार 
-४ मे २०२० रोजी पुन्हा उपवनसंरक्षक, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रारी 
-१ जून २०२० रोजी विभागीय आयुक्त, उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार 
-९ सप्टेंबर २०२० मुख्यवन संरक्षक यांच्याकडे तक्रार 
-१९ आँक्टोबर २०२० रोजी मुख्यवन संरक्षक यांना पुन्हा स्मरण पत्र 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds trees cut down Khatkheda-Sakharvel