भारतीयांनो, लॉकडाऊन पाळा, कोरोना सहज हरेल 

अनिलकुमार जमधडे
सोमवार, 6 एप्रिल 2020

 

मूळ औरंगाबादच्या अमेरिकेतील रहिवासी निर्मला केसभट यांचा सल्ला 

 

औरंगाबाद : सध्या संपूर्ण जगाला एका न दिसणाऱ्या अशा कोरोना विषाणूने हादरून टाकले आहे. खूपच भयंकर स्थिती झाली आहे. अमेरिकेत भयंकर परिस्थिती आहे. भारताने खूप लवकर पावले उचलली आहेत. लोकांनी लॉकडाऊन पाळला तर कोरोना सहज हरणार आहे. विश्वास ठेवा, कोरोनाचा हा अस्थायी थांबा आहे, तो निघून जाईल; मात्र तोपर्यंत त्याला धैर्याने तोंड द्यावे लागणार आहे. म्हणूनच सरकारने दिलेल्या सूचना पाळा, असा सल्ला औरंगाबादच्याच परंतु नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या निर्मला केसभट (शिंदे) यांनी दिला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

निर्मला केसभट (शिंदे) यांनी सांगितले, की अमेरिकेत पन्नास राज्ये आहेत, त्यापैकी ओहयो राज्यात आम्ही राहतो. ओहयोमध्ये सिनसिनाटी हे मोठे शहर आहे. त्यामध्ये मेसन या भागात नोकरीनिमित्त आमचे वास्तव्य आहे. सध्या या कोरोना व्हायरसने मनात खूप कालवाकालव, खळबळ आणि बेचैनी निर्माण झाली आहे. परत केव्हा सगळ्यांच्या भेटी होणार हे माहीत नाही, कधी परत सगळे सुरळीत होणार हेही माहीत नाही. आपले सगळे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी प्रत्येकजण सुखी आणि निरोगी आहेत किंवा नाही याची चिंता सतावत आहे. दररोज हजारो प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात. पण विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होणार आहे. या काळात भरपूर वेळ मिळत आहे, त्याचा अधिक आनंद घेण्याचा प्रयत्न करा. ज्या अनेक बाबी वेळेअभावी करता आल्या नाहीत, जे शक्य झाले नाही ते या काळात पूर्ण करा, असे आवाहन निर्मला केसभट यांनी केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तिथली भयंकर परिस्थिती 
 
अमेरिकेमध्ये सध्या जगातील सर्वाधिक म्हणजे तीन लाख ३७ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यापैकी नऊ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही ज्या शहरात राहतो त्या ओहयो प्रांतात चार हजार ४३ रुग्ण आहेत. त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत खूप कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीस तोंड देण्यासाठी अमेरिका सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

भारताची परिस्थिती खूप चांगली 

त्या मानाने भारतातील परिस्थिती अत्यंत चांगली आहे. बलाढ्य लोकसंख्येचा देश असतानाही भारताने रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यावर यश मिळवले आहे. हे भारताचे यशच यातून मुक्तता करणार आहे. तसेच कोरोनातून मुक्तता मिळविण्यासाठी केलेला लॉकडाऊन हाच सध्याचा सर्वात प्रभावी इलाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून घरातच राहावे. नियम काटेकोर पाळले तरच कोरोनावर विजय मिळवता येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Follow LockDown, Easily Defeated Corona, American Resident Nirmala Kesbhat Advise