पक्षी झाले कमी, पोटात चाललेय विष - वाचा नेमके

Aurangabad news
Aurangabad news

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : निसर्गाच्या हिरवळीत, अंगणातील झाडांवर पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासारखा अन्‌ पाहण्यासारखा असायचा; पण हे चित्र सध्या दुर्मिळ झाले असून, पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसणारे आकाश आज सुनेसुने दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे पक्ष्यांचे अस्तित्वच नष्ट होत असून, ते मानवासाठी धोकादायक ठरत आहे.

निसर्गातील किडे, मुंग्या खाऊन उपजीविका करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत गेल्या दशकात लक्षणीय घट झाल्याने पिकांवरील किडींचे प्रमाणही वाढले आहे. त्यापायी शेतकरी देशोधडीला लागत आहे. काळ्या शिवाराची नांगरणी करताना पूर्वी पाच-पन्नास बगळे बैलजोडीच्या मागेच फिरायचे. जमिनीतील मातीची उलथापालथ झाल्यावर मातीतील किडे, अळ्या वर येत असत अन्‌ बगळे लगेच अचूक टायमिंग साधून त्याला भक्ष्य बनवत होते.

पिकांवरील अळ्याही हे पक्षी अचूक टिपत असत; मात्र आज जमिनीखाली असलेली हुमणी आणि पिकांवर आलेली लष्करी अळी पक्ष्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. सोबतच दरवर्षी सोयाबीन, कपाशी, तूर या महत्त्वपूर्ण पिकांवर बोंडबळी, तुडतुडे यासह विविध किडींचा प्रादुर्भाव होतो.

हा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या जातात. त्यामुळे पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी या माध्यमातून मानवाच्या पोटात विष कालवले जात आहे. सिमेंटची जंगले, महामार्गाची निर्मिती, उद्योग-व्यवसाय, कारखानदारी, मेट्रो उभारण्यासाठी उभ्या वृक्षांवर कुऱ्हाड कोसळली.

त्यामुळे झाडांवर वसणाऱ्या पक्ष्यांची घरटी उद्‌ध्वस्त झाली. असंख्य पक्षी गतप्राण झाले, तर काही पक्ष्यांनी आपला मोर्चा जंगलाच्या दिशेने वळविला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सर्रास आढळणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत. 

मोबाईलच्या अतिरिक्त लहरींमुळे मृत्यू 

आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या युगात मानवनिर्मित नवनवीन शोध लागल्याने जगाची प्रगती झाली. त्यातील मोबाईल क्रांती पक्ष्यांसाठी घातक ठरली आहे. अनेक कंपन्यांनी शहरी, ग्रामीण भागात रेंजसाठी मनोरे उभारले आहेत. त्यातून प्रमाणापेक्षा अधिक लहरी उत्पन्न होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा जीव गुदमरून त्यांचा मृत्यू होत आहे; तसेच ते जंगलाकडे मोर्चा वळवीत आहेत.

पक्ष्यांनाही हृदयविकाराचा धक्का

शहरी, ग्रामीण वातावरणात अतिशय कमी प्रमाणात पक्ष्यांची संख्या पाहायला मिळते; मात्र आहे ते पक्षीही मानव आपल्या हौसेखातर नष्ट करीत आहे. सार्वजनिक मिरवणुका, लग्नसराई, अन्य कार्यक्रमांत डीजे साऊंड लावून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले जाते. ज्यामुळे मानवाप्रमाणेच पक्ष्यांनाही हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा मृत्यू होत असल्याचे काही जाणकार सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com