औरंगाबादेत तीस वर्षात पहिल्यांदा शंभर टक्के बंद : रस्त्यावर स्मशान शांतता

अनिल जमधडे
Sunday, 22 March 2020

नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे सावट 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहानानुसार जनता कर्फ्युच्या निमित्ताने औरंगाबाद शहरात गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच असा १००% कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर सकाळ पासुनच शुकशुकाट दिसत असला तरीही नागरिकांमध्ये कुतूहलही आहे आणि भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत होते. 

भीतीचे सावट

जनता कर्फ्युच्या बंद दरम्यान शहरातील गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर, रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, काही चौकांमध्ये नागरिकांचे आणि तरुणाची काही जत्थे चिंता व्यक्त करताना दिसत होते. शहरातील नेहमीच गजबजलेल्या शहागंज, रोशन गेट, किराडपुरा, औरंगाबाद टाइम्स कॉलनी परिसरात बहुतांश वेळी पाळल्या जाणाऱ्या बंद मध्ये किमान तीस चाळीस टक्के भाग कधीच बंद होत नाही. हा भागही जनता कर्फ्यु दरम्यान भितीच्या सावटाखाली कोरोनाच्या भीतीने मात्र कडकडीत बंद पहायला मिळाला. 

औरंगाबादेत शुकशुकाट, जनता खरच घरात आहे

वाहतूक पोलीसांनी अनुभवली शांतता
 
दुकाने शंभर टक्के बंद होती, रस्त्यावर तुरळक एखादी दुसरी- दुचाकी धावताना दिसत होती. महापालिकेचे पाण्याचे टँकर, काही ठिकाणी कचरा वाहतूकीच्या गाड्या आणि ॲम्बुलन्सही नजरेस पडल्या. मेडीकल दुकाने उघडी होती. एरव्ही वाहतुकीच्या वर्दळीत क्षणभरही फुरसत न मिळणारे वाहतूक पोलीस चौकाचौकांमध्ये झाडांच्या सावलीत शांतपणे विसावलेले दिसत होते. बंदच्या काळात रस्त्यावर, चौकातून फिरणाऱ्या तरुणांना पोलिस मात्र समजूत घालून घराकडे परत होते. 

कोरोनातून बऱ्या झालेल्या औरंगाबादच्या प्रध्यापिका आँन कँमेरा म्हणतात.. 

तीस वर्षात पहिल्यांदा कडकडीत बंद 

शहरातील रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, पैठण गेट, नुतन कॉलनी, सिल्लेखाना चौक, गुलमंडी, औरंगपुरा, सिटीचौक, शहांज तसेच सिडको- हडकोतील टीव्ही सेंटर, एन-७, बजरंग चौक, आझाद चौक, चिश्तीया चौक, एन-३, एन-४, गजानन मंदिर, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसर, चिकलठाणा परिसर, शिवाजीनगर, बीड बायपास परिसर, पैठणरोड, महानुभाव आश्रम चौक अशा शहराच्या प्रत्येक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. औरंगाबाद शहरात गेल्या तीस वर्षात असा कडकडीत शंभर टक्के बंद जनता कर्फ्युच्या निमित्ताने दिसून आला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चर्चा आणि चिंता 

नागरीकांमध्ये चर्चा आणि चिंता स्पष्ट जाणवत होती. शहरातील विविध वस्त्यांच्या गल्लीच्या तोंडावर नागरिकांचे काही ठिकाणी तरुणांचे टोळके चर्चा करताना दिसत होते. चर्चेतून कोरोनाची चिंता सतावताना दिसली. आज जनता कर्फ्यु आहे, उद्यापासून सरकारचा कर्फ्यु राहणार असल्याचीही चर्चा लोक करत होते. ३१ तारखे पर्यंत अशीच परिस्थिती राहील असेही भाकीत नागरिक करत होते. यानिमित्ताने इटली, स्पेन, अमेरिका अशा विविध देशातील परिस्थितीवरही नागरिकांची चर्चा झडत होत्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janta Curfew News Aurangabad