जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीच्या वाटेवर? भाजपचा राजीनामा देण्याच्या आधीपासून होते खडसेंच्या संपर्कात

प्रकाश बनकर
Wednesday, 18 November 2020

भाजपचा राजीनामा देण्यापूर्वी पासून जयसिंगराव गायकवाड हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या संपर्कात होते. राजीनामा दिल्यापासून ते आतापर्यत संपर्कात आहेत.

औरंगाबाद : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षातर्फे सातत्याने डावल्या गेल्यामुळे पक्षातील प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा व प्राथमिक सदसत्वाचा मंगळवारी (ता.१७) राजीनामा देत भाजपला जय श्रीराम केले. याच दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याची घोषणाही विभागीय आयुक्त कार्यालयात स्वत:ची उमेदवारी मागे घेताना केली. मात्र भाजपचा राजीनामा देण्यापूर्वी पासून जयसिंगराव गायकवाड हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या संपर्कात होते. राजीनामा दिल्यापासून ते आतापर्यत संपर्कात आहेत. खडसेच्या माध्यमातून जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्र्वादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गोपीनाथ मुंडेंचा सैनिक म्हणून निवडणुकीत उतरतोय, रमेश पोकळेंचे सूचक विधान; बोराळकरांसमोर आव्हान

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दोन वेळा पदवीधर आमदार म्हणून त्यांनी काम पहिले आहेत. यासह केंद्रात शिक्षण राज्यमंत्री, तर राज्यात सहकार राज्यमंत्रीपदी ही त्यांनी काम केले आहेत. बीड जिल्ह्यातून दोन वेळा खासदार ते राहिले आहेत. दांडगा जनसंपर्क, संघटनात्मक कामात हातखंडा असलेले जयसिंगराव गायकवाड यांच्याकडे गेल्या दहा ते बारा वर्षापासून पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत युती होणार नाही असे गृहीत धरत पक्षाच्या आदेशानी त्यांनी तयारी सुरु केली होती. मात्र भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते.

आता पदवीधर मतदारसंघासाठी त्यांनी तयारी केली. मात्र उमेदवारी शिरीष बोराळकर यांना मिळाली आहेत. यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तो भरूनही पक्षातर्फे त्यांची दखल घेण्यात आली नाही. साधा संपर्कही त्यांना करण्यात आला नाही. अनेक कार्यक्रमाचे त्यांना बोलविण्यात येत नव्हते. प्रत्येक कार्यकारिणीत त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. वरिष्ठपातळीवरूनही त्यांना कुठलाच प्रतिसाद देण्यात येत नव्हता. त्यांनी घडविलेले कार्यकर्त्यांना अनेक कार्यक्रामात मानाचे स्थान देण्यात येत होते.

सतीश चव्हाणांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतला, जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

मात्र जयसिंग गायकवाड यांना डावलण्यात येत होते. याची सल त्यांच्या मनात होती. ते नाराज असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांना कळली. तेव्हापासून ते जयिसंगराव गायकवाड यांच्या संपर्कात होते. एकनाथ खडसे यांच्याच उपस्थितीत १७ नोव्हेंबरला जयसिंगराव गायकवाड दखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार होते. यासाठी खडसेची वेळही ठरली होती. मात्र खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे क्वारंटाईन झाल्याने एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले. यामुळे खडसे यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला. मात्र आजही ते नाथाभाऊंच्या संपर्कात आहेत. त्यांच्याच पुढाकाराने जयसिंगराव राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चाही आता सर्वत्र सुरु झाल्या आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Jaysingrao Gaikwad Join NCP? Before Quiting BJP He Was With Khadse