कवली गावासाठी पंधरा लाखांची गरज 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 मार्च 2020

कवली गावातील पिण्याच्या पाण्याचे पंचायत समितीमार्फत सर्व उद्‍भवांचे नमुने घेऊन सिल्लोड येथील प्रयोगशाळेत तपासून पाहिले जाईल

औरंगाबाद - सोयगाव तालुक्यातील कवली गावात फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे किडनी विकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कवली गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी डिफ्लोराईज्ड युनिट बसविण्यासंदर्भात यांत्रिकी विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. 

डोंगररांगांत असलेल्या कवली गावाची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ७४० इतकी होती. आता त्यात वाढ होऊन ती ८०० ते ९०० इतकी झाली असावी. तालुक्यातील आमखेडा सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या गंभीर प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 

संबंधित बातमी : पाण्यात वाढतेय फ्लोराईड  

या गावात गेल्या दहा वर्षांपासून लोकांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जातो. अनेक दिवसांपासून गावातील लोकांना किडनीचा त्रास होत आहे. गेल्या दहा वर्षांत या गावात पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण तपासण्यात आले नाही. दर दोन-तीन घरांनंतर एका घरात किडनी विकाराचा इथे रुग्ण आढळेल अशी परिस्थिती आहे. 

हेही वाचा : जिल्हा परिषदेत येण्याएवजी जनतेने घ्यावा फोनवर फॉलोअप 

त्रास होत असल्याने गोळ्या-औषधी घेतल्याने त्याचा किडनीवर परिणाम होत असेल, अशी येथील लोकांची धारणा होती; मात्र काही रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पाण्यातील फ्लोराईडची माहिती मिळाली. दरम्यान, कवली ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जिल्हा परिषदेकडे ठराव घेतला आहे. 

नमुने तपासणार 

भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. शेलार यांनी सांगितले, की भूजल सर्वेक्षण विभागाकडून मॉन्सूनपूर्वी आणि मॉन्सूननंतर अशी वर्षातून दोनवेळा प्रत्येक गावातील उद्‍भवातील पाण्याचे नमुने तपासले जातात. आतापर्यंत जिल्ह्यात कुठेही फ्लोराईडचे प्रमाण आढळले नाही. तथापि, कवली गावातील पिण्याच्या पाण्याचे पंचायत समितीमार्फत सर्व उद्‍भवांचे नमुने घेऊन सिल्लोड येथील प्रयोगशाळेत तपासून पाहिले जाईल असे सांगितले.

 क्‍लिक करा : घरातच राहू या, घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या 

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्याकारी अभियंता अशोक घुगे यांनी सांगितले, की कवली गावात डिफ्लोराईज्ड युनिट बसविण्यासंदर्भात यांत्रिकी विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल. हे युनिट बसविण्यासाठी १४ ते १५ लाख रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे.  

ठळक बातमी : कोरोनानंतर सारीचा धोका : औरंगाबादेत एकाचा मृत्यू 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kawali Village Need Fiften Lacs For Water Treatment Soygon Tahsil Aurangabad News